धक्कादायक! गोखले पुलाबाबतच्या स्वत:च्याच अहवालाकडे पश्चिम रेल्वेने दुर्लक्ष केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

अंधेरी स्थानकाजवळ गोखले पुलाचा काही भाग रेल्वे रुळांवर पडल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक दिवसभर बंद पडली होती. या दुर्घटनेनंतर पश्चिम रेल्वेने आपली जबाबदारी झटकण्याचा पूर्ण प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेने पावसाळ्यापूर्वी रेल्वे रुळांवरील पुलांचे सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षण अहवालाकडे पश्चिम रेल्वेने दुर्लक्ष केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं की पश्चिम रेल्वेच्या अंधेरी विभागातील अधिकाऱ्यांनी एप्रिल महिन्यात गोखले पुलाची बारकाईने पाहणी केली होती. या पाहणीमध्ये हा पूल मोठ्या प्रमाणात गंजल्याचं त्यांना कळालं होतं. ही बाब अहवालाच्या स्वरूपात विभागीय अभियंत्यांना कळवण्यात देखील आली होती. या अहवालामध्ये एक सूचना करण्यात आली होती की ४७ वर्ष जुन्या गोखले पुलाची टप्प्याटप्प्याने डागडुजी आणि मजबुतीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे.

पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेला हा अहवाल रेल्वेच्या लेखा विभागाकडे पाठवण्यात आला होता. नियमानुसार या डागडुजी आणि मजबुतीकरकणाच्या कामासाठी किती खर्च येईल याचं अंदाजपत्रक तयार करणं या लेखा विभागाचे काम असते. हे अंदाजपत्र मुंबई महापालिकेकडे पाठवण्यात येते. मात्र यासंदर्भातील फाईल लेखा विभागातच अडकून पडल्याचं या इंग्रजी वृत्तपत्राने छापलेल्या बातमीत म्हटलं आहे. मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेने आपल्याकडे २०११ सालानंतर दुरुस्तीसाठी कोणतीही मागणी केली नसल्याचं सांगितलं आहे. यामुळे झालेल्या दुर्घटनेमागे पश्चिम रेल्वेच्या काही अधिकाऱ्यांचा हलरगर्जीपणा कारणीभूत असल्याचं उघड झालं आहे.