सुरतहून आलेल्या गतिमंद तरुणीची सुखरूप घरवापसी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

वडील रुग्णालयामध्ये दाखल आणि त्याची देखभाल करण्यासाठी आईची सुरू असलेली धावपळ. परिणामी एकाकी पडलेली त्यांची 26 वर्षीय गतिमंद असलेली मुलगी घराबाहेर पडली. ती थेट मुंबईत धडकली. मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने तिच्या पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. मग सुरू झाली शोधाशोध. अखेर अंधेरी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी ननावरे या तिच्या मदतीला धावून आल्या. अंधेरी परिसरात भटकत फिरणाऱया त्या तरुणीला ताब्यात घेऊन तिला सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.

रेहाना सलमाने (26) असे त्या गतिमंद तरुणीचे नाव. 22 सप्टेंबरला अंधेरीतील सहार मार्गावर एक तरुणी रस्त्यात बसून रडत असल्याची माहिती पोलिसांना काही नागरिकांनी हेल्पलाइनवर दिली होती. अंधेरी पोलीस ठाण्याची मोबाईल व्हॅन क्र. 5 त्या ठिकाणी पोहचली. त्या तरुणीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. सपोनि ननावरे यांनी तिच्याशी संवाद साधला असता तिचे लहान मुलांसमान वागण्यावरून ती गतिमंद असल्याचे स्पष्ट झाले. तिला नावगाव विचारले असता ती फक्त मन्नपूर हाच शब्द बोलायची.

23 सप्टेंबरला गणेश विसर्जनाचा बंदोबस्त असल्याने पोलीसांनी तिला चेंबूर येथील महिला सुधारगृहात ठेवले. 25 सप्टेंबरला ननावरे यांनी मन्नपूरमध्ये पाठपुरावा केला असता ते बिहार राज्यातील गावचे नाव असल्याचे समजले. तिचे बोलणे काहीसे बिजनोरच्या नागरिकांप्रमाणे असल्याने ननावरे यांनी बिजनोरच्या परिचयाच्या एका नागरिकाशी संपर्क साधला. त्या नागरिकाने मुलीशी संवाद साधला असता ती मूळची बिजनोरची असल्याचे स्पष्ट झाले. ननावरे यांनी बिजनोर पोलिसांशी संपर्क साधला. तेव्हा ती तरुणी मदनपूर या गावची असल्याचे स्पष्ट झाले, मात्र तिचे कुटुंबीय काही महिन्यांपूर्वीच सुरत येथे स्थायिक झाल्याचे त्या गावातील नागरिकांकडून समजले.

सुरतमध्ये पालक सापडले
पोलिसांनी तपास सुरतच्या दिशेने वळवला. तेथील स्थानिक आंब्रोली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंद असल्याचे समोर आले. मग ननावरे यांनी पोलिसांच्या मदतीने रेहानाच्या वडील व इतर नातेवाईकांशी संपर्क साधला आणि त्यांना रेहानाची माहिती दिली. त्यानंतर तिचे पालक अंधेरी पोलीस ठाण्यात आल्यानंतर रेहानाला त्यांच्या ताब्यात देण्यात आले.