खराब अन्न खाल्ल्याने कामगाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरीच्या पंप हाऊस येथे अन्नातून 5 कामगारांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. यात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. रामबाबू यादव असे मृताचे नाव आहे, तर चौघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रामबाबू यादव, किसन यादव, श्रवण यादव, गोविंद यादव, दीपक यादव हे पंप हाऊस येथील एका चाळीत राहतात. ते अंधेरी येथे रोजंदारीवर काम करतात. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांनी घरी भात आणि भाजी बनवली होती. दुपारी ते एकत्र जेवले. जेवण करून ते झोपले. बुधवारी सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्याने शेजारील रहिवाशांना संशय आला. त्यांनी रामबाबूच्या घराचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यानंतर शेजारील रहिवाशाने स्थानिकांच्या मदतीने दरवाजा उघडला तेव्हा पाच जण बेशुद्ध अवस्थेत दिसले.

याची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. काहीच वेळात पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांनी त्या पाच जणांना जोगेश्वरीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. तेथे डॉक्टरांनी रामबाबूला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच परिमंडळ 10 चे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे हे घटनास्थळी गेले. त्या पाच जणांनी गावठी दारू प्यायली होती अशी अफवा पसरली. त्यामुळे पोलिसांनी त्या पाचही जणांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबला पाठवले. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. त्यांच्या शरीरात दारूचे अंश आढळून आले नाहीत. पोलिसांनी त्यांच्या घरातून जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. त्या जेवणात बुरशी असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रामबाबूच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.