
स्वच्छ-सुंदर मुंबईसाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डमध्येच कचऱ्य़ाची विल्हेवाट लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आखला आहे. यामुळे कचरा डम्पिंग ग्राऊंडवर नेण्याचे काम बंद होणार असल्याने पालिकेचा खर्चही वाचणार आहे. शिवाय या उपक्रमात निर्माण होणारे खत शेतकरी आणि संबंधित कंपन्यांना देण्यात येणार आहे. अंधेरी पश्चिममध्ये 33 मेट्रिक टन कचऱ्य़ावर प्रक्रिया करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापनाच्या उपायुक्त संगीता हसनाळे यांनी ही माहिती दिली.
पालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायट्यांना कचऱ्य़ाचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. आता वॉर्डमध्ये निर्माण होणाऱ्य़ा कचऱ्य़ाची विल्हेवाट त्या त्या प्रभागातच लावण्यासाठी के/पश्चिम प्रभाग क्र. 61मध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढील तीन महिने या उपक्रमावर लक्ष ठेवून आढावा घेतला जाणार आहे. याच्या यशस्वीतेनुसार मुंबईच्या सर्वच वॉर्डमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून कचरा कमी करण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्य़ा उपाययोजनांमुळे दोन वर्षांपूर्वी दररोजचे 7 ते साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत असणारे कचऱ्य़ाचे प्रमाण आता साडेपाच ते सहा हजार मेट्रिक टनांपर्यंत खाली आले आहे.
कचरामुक्त मुंबईसाठी मोहीम
कचरामुक्त मुंबईसाठी पालिका अनेक उपक्रम राबवीत आहे. यात सद्यस्थितीत दररोज निर्माण होणाऱ्य़ा सुमारे सहा हजार मेट्रिक टन कचऱ्य़ापैकी 70 ते 80 टक्के कचऱ्य़ावर प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कचरा व्यवस्थापनाला प्रोत्साहन देण्यासाठी कचऱ्य़ाचे वर्गीकरण, ओल्या कचऱ्य़ापासून खतनिर्मिती, सुक्या कचऱ्य़ाची विल्हेवाट, टाकाऊ पाण्याचा पुनर्वापर किंवा पर्जन्य जल संधारण योजना राबविणाऱ्य़ा सोसायटय़ा-आस्थापनांना करात सूट देण्यात येत आहे.
यात उगमस्थानी ओल्या कचऱ्य़ापासून खतनिर्मिती आणि सुक्या कचऱ्य़ाचे वर्गीकरण यासाठी मालमत्ताकरामधील सर्वसाधारण करात 10 टक्के सूट देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
मुंबई कचऱ्य़ाचा प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे. यासाठी शाळा, कॉलेज, फेरीवाले, दुकानदार, रहिवासी आणि शक्य तितक्या घटकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ओल्या कचऱ्य़ापासून खत आणि प्लॅस्टिकसारख्या सुक्या कचऱ्य़ापासून प्रक्रिया करून पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. – संगीता हसनाळे, उपायुक्त





























































