
सामना प्रतिनिधी । श्रीरामपूर
नगर जिल्हा अंगणवाडी सेविका, मदतनीस कर्मचारी युनियनतर्फे ३ ऑगस्टला सकाळी ११ वाजता नगर जिल्हा परिषदेवर विविध समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे युनियनचे कॉ.राजेंद्र बावके यांनी जाहीर केले. विविध प्रलंबित समस्यांच्या सोडवणुकीसाठी होणाऱ्या मोर्चात जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन बावके यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय्य मागण्यासाठी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात संप केला होता. संप चिरडण्याचा सरकारने आटोकाट प्रयत्न केला. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीपुढे झुकत सरकारला मानधनवाढ करावी लागली होती.
कर्मचाऱ्यांच्या अपेक्षेनुसार मानधनवाढ झाली नसली तरी संप यशस्वी झाला. संपाचा राग मनात धरून सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे सेवासमाप्तीचे वय ६५ वरून ६० केले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप बंदीचा मेस्मा कायदा लागू करून अगंणवाडी कर्मचाऱ्यांना निशस्र करण्याचाही डाव आखण्यात आला. मात्र, सरकारचा हा डावही संघटनेने हाणून पाडला. आजही अंगणवाडी कर्मचाऱ्याचे बहुसंख्य प्रश्न सोडविण्याबाबत सरकारने आश्वासन देऊनही ते सोडविलेले नाहीत. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बजेट दुप्पट करून योजना बळकट करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीच्या लाभाच्या रक्कमेत तिप्पट वाढ करावी, टीएचआर बंद करण्यात यावा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर लाईन लिस्टींग व बाल हक्क आधार कार्ड नोंदणीची सक्ती करण्यात येऊ नये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांना छापील रजिस्टर व अहवाल फॉर्म द्या, मराठी शाळांना बालवाडी काढण्यास परवानगी देऊ नये, बालवाडीची सेवा ग्राह्य धरण्यात यावी, मिनी अंगणवाडीचे मोठ्या अंगणवाडीत रूपांतर तातडीने करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.






























































