म्हाडाच्या कारभारावर नॅशनल लायब्ररीच्या सभासदांमध्ये संताप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पूर्व येथील म्हाडा इमारतीत असलेली नॅशनल लायब्ररीची शाखा गेली अनेक वर्षे ज्ञानार्जनाचे काम करत आहे. वांद्रे आणि परिसरातील नागरिकांसाठी पुस्तकांचा मोठा खजिना तिथे आहे. मात्र सध्या म्हाडाच्या व्यावसायिक धोरणाचा फटका या लायब्ररीला बसला आहे. भाडेवाढ करून थकीत सुमारे 75 लाख रुपये भरा नाहीतर ग्रंथालय रिकामे करा, अशी नोटीस म्हाडाने लायब्ररीला पाठवली आहे. म्हाडाच्या मराठीद्वेष्टय़ा कारभाराने नॅशनल लायब्ररीशी जोडलेले अनेक वाचक सभासद अस्वस्थ झाले आहेत. ग्रंथालय वाचलं पाहिजे, वाचन संस्कृती टिकली पाहिजे, अशा भावना व्यक्त होत आहेत.

वांद्रे पश्चिम येथील एस.व्ही. रोड येथील नॅशनल लायब्ररी संस्था 104 वर्षे वाचन संस्कृती रुजवण्याचे काम करत आहे. तिची एक शाखा 1975पासून वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील तळमजल्यावर सुरू आहे. 250 चौरस फुटांचा हा गाळा आहे. त्यासाठी 215 रुपये प्रतिचौरस फूट दराप्रमाणे 75 लाख 36 हजार रुपये थकीत भाडे भरण्याचे आदेश संस्थेला देण्यात आले आहेत. संस्थेचे सामाजिक कार्य लक्षात न घेता म्हाडाने व्यावसायिक भाडे आकारणी केली आहे. याबाबतचे वृत्त आज दै. ‘सामना’ने प्रकाशित केले. त्यानंतर अनेक वाचक सभासदांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लायब्ररी वाचावी यासाठी पूर्वीच्या दराने भाडे आकारावे, अशी मागणी होत आहे. म्हाडाच्या या धोरणाने वाचन संस्कृती टिकणार कशी, असा संतप्त सवाल करण्यात येत आहे.

सभासदांनी व्यक्त केली नाराजी
1975पासून म्हणजे लायब्ररीच्या स्थापनेपासून मी सभासद आहे. मी निवृत्त शिक्षिका आणि कवयित्री, लेखिका आहे. माझे अनेक कार्यक्रम असतात. त्यांच्या तयारीसाठी, अभ्यासासाठी लायब्ररीतून मी पुस्तके आणते. उत्तमोत्तम पुस्तके इथे मिळतात. मराठी वाचकांवर, पुस्तकप्रेमींवर अन्याय होता कामा नये, लायब्ररी वाचली पाहिजे.- जयश्री चौधरी

माझ्यासाठी तर ही घरची लायब्ररी आहे. मी इथली लाईफ मेंबर आहे. जे पुस्तक हवं ते मिळतं. नसेल तर मागवून दिले जाते. इथे पुस्तकांचा खजिना आहे. म्हाडाचे कर्मचारीही इथे येतात. मराठी वाचवा, असे आपण म्हणतो. मग लायब्ररींना का प्रोत्साहन देत नाही? -अंजली रिसबूड

वांद्रे आणि नजीकच्या परिसरातील अनेक जण इथे नेमाने येतात. जर लायब्ररी बंद झाली, तर आम्ही जाणार कुठे? समजा मी वांद्रे पश्चिमेकडील मुख्य लायब्ररीत गेलो, तरी प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. लांब पडेल. वाचन संस्कृती जपण्यासाठी लायब्ररी सुरू ठेवावी.- चंद्रशेखर उपरकर

ज्येष्ठ नागरिकासांठी खूप सोयीस्कर लायब्ररी आहे. लायब्ररीमुळे माझ्यासारखे अनेक जण वाचनाचा छंद कायम ठेवू शकले. लायब्ररीची कमाई जास्त नाही. सभासदांकडून 70 रुपये एवढी वर्गणी घेतली जाते. मग सुमारे 75 लाखांचे भाडे लायब्ररी कसे भरणार? लायब्ररीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून न पाहता म्हाडाने भाडे कमी केले पाहिजे.- पाश्वर गोसावी