
अनिकेत कोथळे खून खटल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला हवालदार अनिल लाड यांची चौकशी केली. त्या चौकशीदरम्यान खुनाचा उलगडा झाला. तसेच घटनास्थळ आणि महादेवगड डोंगर येथे मृतदेह जाळलेले ठिकाणही दाखवल्याची महत्त्वपूर्ण साक्ष तत्कालीन पोलीस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी नोंदवली.
अनिकेत कोथळे खून खटल्यात जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरतपास घेतला.
थर्ड डिग्रीचा अवलंब करून सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत 6 नोव्हेंबर 2017 रोजी संशयित अनिकेत कोथळे याचा खून करण्यात आला. या खटल्याच्या सुनावणीला आजपासून सुरुवात झाली. या खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, नसरुद्दीन मुल्ला, वाहनचालक राहुल शिंगटे आणि झीरो पोलीस झाकीर पट्टेवाले आदी संशयित आहेत. एक संशयित हवालदार अरुण टोणे याचा आजाराने कारागृहातच मृत्यू झालेला आहे.
सुनावणीत तत्कालीन उपअधीक्षक धीरज पाटील यांनी साक्ष नोंदवली. ते म्हणाले, ‘पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार निरीक्षक राजन माने यांच्याकडून तपास घेतला. त्यावेळी संशयित आरोपी अनिल लाड यास समक्ष हजर केले. गुह्याविषयी विचारपूस करून अटक केली. राजन माने यांना उर्वरित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले. लाड याला विश्वासात घेऊन माहिती घेतली असता, कोथळे याचा मृतदेह एमएच 10 सीएल 832 या कारमधून महादेवगड डोंगरात नेऊन जाळल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार घटनास्थळी पंचनामा करण्यात आला.
सरतपासादरम्यान सरकार पक्षाचे वकील आणि बचाव पक्षाचे वकील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. साक्षीदार पाटील यांचा ऍड. निकम यांनी सरतपास घेतल्यावर बचाव पक्षाचे ऍड. विकास पाटील-शिरगावकर, ऍड. गिरीश तपकिरे, ऍड. प्रमोद सुतार यांनी उलट तपास सुरू केला. जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख, ‘सीआयडी’चे तत्कालीन उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी, निरीक्षक मनोज बाबर यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.

























































