
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव विधानसभा मतदारसंघात अनेक शाळांमध्ये नियमबाह्य पद्धतीने बोगस तुकडय़ांना मंजुरी देण्यात आली. त्या आधारावर बॅक डेटमध्ये बोगस शिक्षक भरती सुरू असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.
शिक्षक भरती घोटाळा केवळ नागपूर जिह्यापुरता मर्यादित नाही. राज्यात अनेक ठिकाणी हा घोटाळा सुरू आहे. 2015 पासून नव्या तुकडय़ांना मान्यता देण्यास मनाई आहे, पण त्यानंतरही मालेगावातील शाळांमध्ये मागच्या तारखेत तुकडय़ांना मान्यता देऊन 100 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. अल्पसंख्याक संस्थांच्या शाळांमध्ये हा प्रकार जास्त प्रमाणात दिसून येत असल्याचे अनिल देशमुख म्हणाले.
शिक्षक भरतीची न्यायालयीन चौकशी करा
नागपूर शिक्षक भरती घोटाळय़ाच्या चौकशी एसआयटी करीत आहे. शिक्षणमंत्रांच्या मतदारसंघात बोगस तुकडय़ांना नियमबाह्य पद्धतीने मान्यता देऊन बोगस शिक्षक भरती होत असेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यभरातील शिक्षक भरतीची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या माध्यमातून करावी, अशी मागणी देशमुख यानी केली.





























































