
माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता सीबीआयनंतर अंमलबजावणी संचालनालयाच्याही (ईडी) जाळ्यात सापडले आहेत. ‘ईडी’ने भ्रष्टाचाराच्या आरोपावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोणत्याही क्षणी ‘ईडी’कडून त्यांची चौकशी सुरू केली जाऊ शकते.
अनिल देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते तसेच अनेक अधिकाऱयांच्या बदल्या त्यांनी भ्रष्ट मार्गाने केल्या असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केले होते. उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱयाने थेट गृहमंत्र्यांवर असे गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती.
याप्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. त्यात आता ईडीही चौकशी करणार आहे. देशमुख यांनी त्यावर एका व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ‘ईडी’कडून चौकशी होणार हे आपल्याला माध्यमांकडूनच समजले असे त्यांनी म्हटले आहे.
हा मोदी सरकारचे कोरोनातील अपयश झाकण्याचा प्रयत्न – काँग्रेस
अनिल देशमुख यांच्यावर ईडीने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरडय़ा मनोवृत्तीचे व लोकशाहीला घातक अशा भयानक राजकारणाचे प्रतीक आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी व्यक्त केली आहे. कोरोना हाताळण्यात मोदी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी केलेला हा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठीच गुन्हा – राष्ट्रवादी काँग्रेस
महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच अनिल देशमुख यांच्यावर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. केंद्रातील भाजप सरकार सर्व केंद्रीय एजन्सींचा वापर करून राजकारण करतेय हे यावरून स्पष्ट झाले आहे, असे मलिक यांनी म्हटले आहे.




























































