फडणवीसांचा स्वप्नभंग झाला, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा टोला

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्ता स्थापनेसाठी ऑफर दिली होती असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. फडणवीस यांचा हा दावा राष्ट्रवादीचे नेते गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फोल ठरवला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असल्याने चर्चेचा प्रश्नच नव्हता उलट फडणवीस यांना सुरुवातीला सरकारमध्ये येण्याची स्वप्ने पडत होती, पण त्यांचा स्वप्नभंग झाला, असा टोला अनिल देशमुख यांनी लगावला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांचा दावा खोडून काढला. ते म्हणाले, ‘असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब सध्या अस्वस्थ आहेत. बेचैन आहेत. त्यांना सुरूवातीला सरकारमध्ये येण्याची स्वप्ने पडत होती, पण त्यांचा स्वप्नभंग झाला. त्यामुळे अशा प्रकारचे दावे करून ते जुन्या गोष्टी काढत राहतात. ते अस्वस्थ आहेत. फडणवीसांसोबत चर्चा करण्याचा प्रश्नच नव्हता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमची सुरुवातीपासूनची आघाडी होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही निवडणुका लढवल्या. त्यानंतर शिवसेना आमच्याबरोबर आली. या तिन्ही पक्षांचं सरकार चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्ये करतात, असा टोला देशमुख यांनी लगावला.

आपली प्रतिक्रिया द्या