बॉम्बे नाही, मुंबई म्हणजे मुंबईच, अनिल परब यांच्याकडून केंद्रीय मंत्र्याच्या वक्तव्याचा निषेध

पवई येथील आयआयटीच्या बॉम्बेच्या नावात बॉम्बे तसेच ठेवले, मुंबई केले नाही ते चांगलेच झाले असे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी केले होते. शिवसेना आमदार अनिल परब यांनी नियम 93 अन्वये आज विधान परिषदेत हा मुद्दा मांडत केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला. मुंबई हा मराठी माणसाच्या अस्मितेचा विषय आहे, बॉम्बे नाही…मुंबई म्हणजे मुंबईच असे त्यांनी ठामपणे सांगितले. बॉम्बे नाव बदलून कायद्याने मुंबई करण्यात आले आहे. शिवसेनेने त्यासाठी वर्षानुवर्षे संघर्ष केला होता. मुंबाई देवीच्या नावाने मुंबई हे नाव देण्यात आले असून तो मुंबईकरांच्या अस्मितेचा विषय आहे, असे अनिल परब यांनी सभागृहाला सांगितले. या मुद्दय़ावर मंत्री आशीष शेलार यांनी निवेदन केले.  बॉम्बे नाही, मुंबईचे नाव मुंबईच आहे ही राज्य शासनाची भूमिका आहे. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून ही भूमिका स्पष्ट केली असल्याची माहितीही शेलार यांनी दिली.