शासन जनतेसोबत; लवकरच कोरोनावर मात करु – ॲड. अनिल परब

377

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनापाठोपाठ निसर्ग चक्रीवादळ आलं, या आपत्तीच्या काळात शासन खंबीरपणे जनतेच्या मागे उभे आहे. या संकटावर मात करुन जिल्हा नव्याने उभा करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन परिवहन मंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी शनिवारी केले. यावेळी कोविडयोद्धांचा परब यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्यातील शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री ॲड. परब यांच्याहस्ते पोलीस कवायत मैदानावर झाले. यावेळी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. अध्यक्ष रोहन बने, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी इन्दूमती जाकर, सभापती महेश म्हाप, नगराध्यक्ष प्रदीप साळवी तसेच जि.प. सदस्य आणि नगरसेवक उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळाच्या काळात नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यापासून सर्व उपाययोजना जिल्हा प्रशासनाने केल्या. या संकटात प्राणहानी होऊ नये, याची खबरदारी घेतली. याबद्दल आपण प्रशासन आणि प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, या चक्रीवादळात नुकसान झालेल्यांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी 100 कोटी जाहिर केले होते. आपत्ती प्राधिकरणाचे नियम बदलून अधिकाधिक नुकसानग्रसतांना आर्थिक भरपाई मिळावी यासाठी शासनाने मदतीचे निकष बदलले. तसेच झाडनिहाय भरपाईचेही धोरण अंगिकारले. जिल्ह्यात आतापर्यंत 116.98 कोटी रुपये बाधितांच्या मदतीसाठी आले आहेत. त्यातील 77.35 कोटी रुपये मदत स्वरुपात देण्यात आले असून अतिरिक्त 71.88 कोटींची मागणी देखील शासनाच्या विचाराधीन आहे व ती देण्याची शासनाची भूमिका आहे.

याच काळात आपण कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करत आहोत. यात सहकार्य करणाऱ्या व झोकून देऊन काम करणाऱ्या कोरोना योद्धांचे आपण अभिनंदन करतो आणि शासनातर्फे आभार मानतो, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले. कोरोना काळात असणारा गणेशोत्सव आणि गावात येणारे चाकरमानी यांचा विचार करुन अनेक बाबी शासनाने केल्या आहेत. सर्वांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्कचा वापर या नियमांचे पालन करुन आरोग्य शिबीर व इतर सामाजिक उपक्रम राबवत उत्सव साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांच्या सहकार्यातून गणरायाच्या कृपेने आपण या संकटावर मात करु, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या