एसटी कर्मचाऱयांच्या प्रश्नांवर दिवाळीनंतर सकारात्मक चर्चा करणार; अनिल परब यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी कर्मचाऱयांचे राज्य शासनात विलीनीकरण आणि अन्य मुद्दय़ांबाबत दिवाळीनंतर राज्य शासन स्तरावर चर्चा घडवून आणू, असे आश्वासन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी दिले.

एसटी कर्मचाऱयांच्या मागण्यांसंदर्भात परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये एसटी कर्मचाऱयांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली. शासकीय कर्मचाऱयांच्या प्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व दिवाळी भेट एसटी कर्मचाऱयांना त्यांच्या वेतनासोबत देण्यात आल्याचे मंत्री परब यांनी सांगितले. याबाबत दरेकर यांनी शासनाचे आभार मानले.

एकाही कर्मचाऱयावर कारवाई नाही

संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱयांवर कोणतीही कारवाई करू नका, अशी विनंतीदेखील त्यांनी परिवहन मंत्र्यांना केली. याबाबत बोलताना मंत्री परब म्हणाले की, आज अखेर अघोषित संपावर असलेल्या कोणत्याही कर्मचाऱयावर कारवाई झालेली नाही तसेच तातडीने सर्व कर्मचाऱयांनी आपल्या कर्तव्यावर रुजू व्हावे व सर्वसामान्य जनतेची गैरसोय टाळावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.