परिवहनमंत्री अनिल परब यांचे खुले आव्हान; वाझे याचे सगळे आरोप निराधार; कोणत्याही चौकशीला तयार!

सचिन वाझे याचे आरोप म्हणजे मला बदनाम करण्याचे कारस्थान आहे. भाजपचे नेते दोन दिवसांपासून आरडाओरड करत होते. आणखी एक बळी घेऊ म्हणत होते. सचिन वाझे आज पत्र देणार त्यामुळे तिसरी विकेट काढणार हे भाजपला आधीच माहीत होते. दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, सचिन वाझे याचे माझ्यावरील आरोप साफ खोटे आहेत, अशा शब्दांत परिवहनमंत्री अनिल परब यांनी सचिन वाझे यांच्या कथित पत्रात करण्यात आलेले आरोप फेटाळतानाच मी पूर्णपणे कायदेशीर लढणार, अशा धमक्यांना मी घाबरत नाही, असा इशाराच दिला.

  सचिन वाझे याने एनआयएला दिलेल्या कथित पत्राबाबत अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. अनिल परब म्हणाले, सचिन वाझेने लिहिलेल्या पत्रात माझ्या नावाचा उल्लेख केला आहे. जून, ऑगस्ट 2020 ला वाझे याने एसबीयूटी ट्रस्टीकडून 50 कोटी घेण्याचा आरोप केला आहे. त्याचप्रमाणे जानेवारी 2021ला मी मुंबई महापालिका कंत्राटदाराकडून 2 कोटी रुपये जमा करण्याच्या सूचना दिल्या. मग इतक्या दिवसांमध्ये त्याने यावर काहीही सांगितलं नाही. परमबीर सिंग यांच्याही पत्रामध्ये याचा कुठेही उल्लेख नाही. पण मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करणं गरजेचं आहे हा एका धोरणाचा भाग आहे. या दोन्ही गोष्टी खोटय़ा आहेत, माझ्यावर खंडणीचे कोणतेही संस्कार नाहीत, असे म्हणत  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन मी सांगतो, की हे खोटं आहे. मला बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत.

नार्कोटेस्ट केली तरी सामोरा जायला तयार

सीबीआय चौकशीचा निर्णय आला आणि आज हे पत्र आलं. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांना पत्र लिहिलं त्यात हा उल्लेख नाही. आतापर्यंतच्या पत्रात कुठेही असा उल्लेख नाही. एनआयएची चौकशी स्फोटकांची आहे, पण त्याचा शोध अजून लावला नाही. माझी नार्को टेस्ट केली तरी मी सामोरा जायला तयार आहे. एनआयए, सीबीआय, रॉ कुठलीही चौकशी लावली तरी मी तयार आहे. सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र आहे, असे अनिल परब यांनी यावेळी स्पष्ट केले.

तर माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील

सचिन वाझे कस्टडीत आहे. त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रं बाहेर काढून सरकारला बदनाम केलं जात आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते, प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते हे मान्य करतो. पण वाझेला शिवसेनेने असं काम करायला सांगितलं नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटरबॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा. मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील. मी पूर्णपणे कायदेशीर लढणार, मी लढाईच्या तयारीत आहे. अशा धमक्यांना मी घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी भाजपला दिला.

  • भाजपने हे बनवलेलं प्रकरण आहे. आजच्या पत्रात माझ्यावर, अनिल देशमुख आणि अजित पवार यांच्या जवळचे घोडावत यांच्यावर आरोप केले आहेत. माझ्यावर केलेले हे आरोप खोटे आहेत. मी कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे.

काय आहे वाझेच्या कथित पत्रात?

  • जून 2020 रोजी मला सेवेत घेण्यात आले, पण काही लोकांकडून याचा विरोध झाला. अनिल देशमुख यांनी मला बोलावून सांगितले की, शरद पवार तुम्हाला पुन्हा सेवेत घेऊ इच्छित नाहीत. पवार साहेबांना पटवून देण्याचे आश्वासन देत त्यासाठी दोन कोटी रुपये मागितले.
  • ऑक्टोबर 2020 मध्ये माझी सीआययूमध्ये नियुक्ती करण्यात आल्यानंतर गृहमंत्र्यांनी ‘सह्याद्री’ अतिथीगृहात मला बोलावले आणि  मला आठवण करून दिली की, तुम्हाला दोन कोटी द्यावे लागतील. n नोव्हेंबर 2020 मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जवळची व्यक्ती असणारे दर्शन घोडावत यांनी माझी भेट घेतली. मला बेकायदेशीर गुटखा विव्रेत्यांची यादी देत 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले. मी त्यास नकार दिला असता घोडावत यांनी नोकरी जाण्याची धमकी दिली.
आपली प्रतिक्रिया द्या