संप सुरूच ठेवला तर पगारकपातीची कारवाई आणि पगारवाढही मागे, परिवहनमंत्री अनिल परब यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पगारवाढ दिल्यानंतरही एसटी संपावर ठाम असणाऱया कर्मचाऱयांना परिवहन मंत्री अनिल परब यांनी इशारा दिला आहे. पैसे देऊनही संप चालू राहणार असेल तर पैसे न देता संप सुरू राहिला तर काय वाईट आहे, असा विचारही सरकार करू शकते. संप सुरूच ठेवला तर केलेल्या पगारवाढीबाबतही फेरविचार करावा लागेल. पगारवाढीनंतरही संप करणाऱया कर्मचाऱयांचा बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज दिला.

परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी कर्मचारी कृती समितीची बैठक आज पार पडली. बैठकीनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी अनिल परब यांनी कामगारांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करतानाच रुजू न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला. अनिल परब म्हणाले, मी कुठल्याही चर्चेची दारं बंद केलेली नाहीत; परंतु सतत आर्थिक भार स्वीकारत राहायचा आणि त्या बदल्यात एसटी बंद ठेवायची असेदेखील होणार नाही. आम्ही आमच्याकडून चार पावलं पुढे आलेलो आहोत. कामगारांनी ताबडतोब संप मागे घ्यावा. एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. कामगारांचे हक्क अबाधित ठेवणं हे प्रशासनाचं कामच आहे. संप संपला पाहिजे आणि एसटी सुरळीत झाली पाहिजे.

दहा वर्षांच्या कराराबाबतही विचार होऊ शकतो

एसटी कर्मचाऱयांसाठी फार मोठा आर्थिक दिलासा राज्य शासनाने दिला आहे. मी वारंवार हेच सांगतोय की, जो विलीनीकरणाचा मुद्दा त्यांच्या डोक्यात आहे… ज्यामध्ये त्यांना असं वाटतं की, आमचे पगार वाढायला पाहिजेत, आम्हाला नोकरीची शाश्वती असली पाहिजे, आमचे पगार वेळेवर व्हायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टी शासनाने मान्य केल्या आहेत. एक मागणी अशीपण आली की, सातवा वेतन आयोग आम्हाला द्या आणि आमचा करार दहा वर्षांचा करा. आमचा चार-चार वर्षांचा करार असतो. मग दहा वर्षांचा करार केला तर एसटीवरती एकूण किती खर्च येऊ शकतो? काय होऊ शकते? आम्ही त्यावरही विचार करू, असे आश्वासन अनिल परब यांनी दिले.

साडे अकरा हजार कामगार डय़ुटीवर

एसटी कामगारांच्या भावना भडकविणाऱया भाजपाच्या नेत्यांनी आंदोलनातून काढता पाय घेतल्याने आझाद मैदानातील संपकऱयांची संख्या चांगलीच रोडावली आहे. दुसरीकडे वेतनवाढीच्या घोषणेनंतर कामगार कामावर परतण्याचा सिलसिला कायम असून शुक्रकारी सुमारे साडे अकरा हजार कामगार कामाकर रूजू झाले आहेत. दरम्यान, महामंडळाने कामावर न परतल्याने एकूण 3215 जणांना निलंबित केले असून 1226 जणांची सेवा समाप्त केली आहे.

सरकार चार पावले पुढे आलेय, संप मागे घेऊन कामावर रुजू व्हावे

आज महाराष्ट्र सरकार चार पावले पुढे आलेय, भरघोस वेतनवाढ दिलेली आहे. मग अशा वेळी संपावरती केवळ एका मुद्दय़ासाठी जो विलीनीकरणाचा मुद्दा सरकारच्या हातात नसून उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या हातात आहे त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच त्याबाबत विचार होईल. तोपर्यंत एसटी बंद ठेवणं हे ना कर्मचाऱयांना परवडणारं आहे, ना सरकारला परवडणारं आहे. संप मागे घेऊन ज्या वेळी कामकाज सुरू होईल त्या वेळी या छोटय़ामोठय़ा गोष्टी ज्या आहेत त्यावर माझी चर्चा करायची तयारी आहे, असेदेखील कृती समितीला सांगितल्याचे अनिल परब म्हणाले.

कर्मचाऱयांचं कुठंही नुकसान होणार नाही याची काळजी नक्कीच घेऊ

कर्मचाऱयांच्या कृती समितीशी चर्चा करताना एसटी कर्मचाऱयांना दिलेली पगारवाढ ही मूळ वेतनात दिलेली असल्यामुळे त्यांच्या ग्रेड्समध्ये काही तफावत निर्माण होऊ शकते, काही अडचणी निर्माण होऊ शकतात अशा प्रकारच्या काही बाबींचा उल्लेख त्यांनी केला. सुरुवातीला सरसकट पगारवाढ दिल्यानंतर या सगळ्या गोष्टी होत असतात. संप जेव्हा संपेल, ज्या वेळी सर्व कामकाज सुरू होईल त्या वेळी यावर बसून विचार करता येईल. कुठल्याही कामगारावर अन्याय होणार नाही. कुठलाही कनिष्ठ कामगार वरिष्ठ कामगाराच्या वर जाणार नाही, याची काळजी आम्ही जरूर घेऊ. कर्मचाऱयांचं कुठंही नुकसान होणार नाही याची काळजी आम्ही नक्कीच घेऊ. पण त्याचबरोबर कुठलीही बेशिस्तदेखील खपवून घेतली जाणार नाही, याचीदेखील जाणीव आम्ही त्यांना करून दिलेली आहे, असे परब म्हणाले.

तुटेपर्यंत ताणू नका, संप स्थगित करा, राजपत्रित अधिकारी महासंघाचा एसटी कामगारांना सल्ला

कोणतेही आंदोलन सुरू करताना ते मागे घेण्याचे दरवाजे खुले ठेवायचे असतात. एसटी कामगारांनी एकजुटीतून मोठा दबाव आणल्याने 41 टक्के वेतनवाढीची घोषणा करणे सरकारला भाग पडले आहे. हे कर्मचाऱयांचे प्रचंड यश आहे. मात्र वेतनवाढ जाहीर केल्यानंतरही संप सुरूच ठेवल्यामुळे एसटीअभावी अतोनात हाल झालेल्या ग्रामीण भागातील जनतेची सहानुभूती गमावण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुटेपर्यंत ताणू नका, असा सल्ला महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पत्रक काढून संपकरी एसटी कामगारांना दिला आहे.

आपण सर्व जण मध्यमवर्गीय असल्याने पगाराची तारीख येते, त्या वेळी आंदोलन अधिक न लांबविता आपल्या गरजू कुटुंबीयांसाठी पगार प्राप्त होईल याचीही वेळोवेळी दक्षता घ्यावी लागते. तुटेपर्यंत न ताणता सध्याच संप स्थगित करणे समयोचित होईल, असे आवाहन राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य सल्लागार ग.दि. कुलथे यांनी पत्रक काढून एसटी कामगारांना केले आहे.

37 आगारांतून वाहतूक सुरू

एकूण 37 आगारांतील वाहतूक सुरू झाल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली आहे. परळ, ठाणे, कल्याण, स्वारगेट, शिवाजीनगर, दौंड, नाशिक, चंदगड, इचलकरंजी, धुळे, जळगाव, सातारा, पालघर, सफाळा, वसई, खेड, देवरूख, राजापूर, चिपळूण, महाड, माणगाव, पेण, रोहा, संभाजीनगर, शेवगाव, सोलापूर, सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, जत, आटपाडी, कवटे महांकाळ, पलुस अशा 37 आगारांतील एसटी वाहतूक सुरू झाली आहे.