ती गेली ओ! अंजू हिंदुस्थानात गेल्यावर नसरुल्लाची रडारड, पाकिस्तानी सरकारने धोका दिल्याचा आरोप

पती आणि मुलांना सोडून पाकिस्तानात गेलेली अंजू पुन्हा हिंदुस्थानात परतली असून ती आता तिचा इथला पती अरविंद याच्याशी घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत आहे. हिंदुस्थानात या घडामोडी सुरू असताना तिकडे पाकिस्तानात नसरुल्लाची रडारड सुरु झाली आहे.

मूळची राजस्थानची रहिवासी असलेली अंजू पती आणि मुलांना सोडून फेसबुकवर ओळख झालेल्या पाकिस्तानातील प्रियकराशी लग्न करण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. 5 महिने पाकिस्तानमध्ये राहिल्यावर ती पुन्हा हिंदुस्थानात आली आहे. पती अरविंदशी घटस्फोट घेणे आणि मुलांना पाकिस्तानात घेऊन जाणे हा हिंदुस्थानात येण्यामागचा तिचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. पण, या सर्व घडामोडींमुळे अंजूचा पाकिस्तानी पती नसरुल्ला अस्वस्थ झाला आहे. अंजूला आता लवकर भेटता येणार नसल्यामुळे तिच्या आठवणीत नसरुल्ला झुरायला लागला आहे. नसरुल्ला याने म्हटले की, “अंजू जर पाकिस्तानात पुन्हा आली नाही तर मी तिच्यासाठी हिंदुस्थानात जाईन. तो पुढे म्हणाला की, मी अंजूचा पती आहे आणि जर मला हिंदुस्थानात जाण्यासाठी व्हिसा मिळाला तर मी नक्की जाईन.

नसरुल्लाने अंजूच्या मुलांना स्वीकारण्याची तयारी दर्शवली आहे. तो म्हणतो हे पाकिस्तानचे प्रेम आहे, हिंदुस्थानचे नाही. अंजू हिंदुस्थानातील तिच्या पतीला घटस्फोट देण्यासाठी गेली आहे. अंजूचा तिच्या वडीलांशी आणि अरविंदशी कोणताही संपर्क नसल्याची माहिती नसरुल्लाने माध्यमांशी बोलताना दिली.

हिंदुस्थानातील गुप्तचर यंत्रणा सतर्क

1 महिन्याचा व्हिसा असताना 5 महिने अंजू पाकिस्ताना राहिली आणि पाकिस्तान सरकाने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे हिंदुस्थानातील गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. अंजू राहत असणाऱ्या राजस्थानच्या भिवाडी भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सर्व वाहनांची कसून चौकशी केली जात आहे. हिंदुस्थानात आल्यावर अंजू कुठे आहे याची माहिती मिळालेली नाही. पण सांगितले जात आहे की ती दिल्लीच्या एका न्यायालयात पोहोचली आहे.

या संपूर्ण प्रकरणाचा तपास आयबी आणि पोलीस संयुक्तपणे करत आहेत. अंजूच्या मुलांची चौकशी करण्यात आली आहे. भिवाडीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक सैनी यांनी अंजूच्या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगितले आहे. ते म्हणाले की, वेळ पडली तर अंजूचीही चौकशी करण्यात येईल. चौकशीनंतर गरज पडल्यास तिला अटकही करण्यात येईल. तत्पूर्वी, पाकिस्तानातून हिंदुस्थानात येण्यापूर्वी इंटेलिजन्स ब्युरो आणि पंजाब पोलिसांनी अंजूची चौकशी केली होती. चौकशीनंतरच तिला दिल्लीला जाण्याची परवानगी देण्यात आली.

अंजू गेली कुठे?

दिल्लीत जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर अंजू दिल्लीला पोहोचली खरी पण आता ती कुठे आहे याचा ठावठिकाणा कोणलाच नाही. अंजू आपल्या मुलांना घेऊन पाकिस्तानात जाणार असल्याचे सांगत आहे. पण, तिला पाकिस्तानात जाण्यासाठी पुन्हा व्हिसा मिळालेला नाही. नसरुल्लाने अंजूला व्हिसा मिळावा यासाठी बरेच प्रयत्न केले पण पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाने त्याला दाद दिली नाही. आता किमान वर्ष तिला व्हिसा मिळण्याची शक्यता नाही. काही महिन्यांपूर्वी नसरुल्लाने एका मुलाखतीत दावा केला होता की अंजूला 1 वर्षांचा व्हिसा मिळाला आहे. पण असे काहीच घडले नसल्याचं समोर आले आहे.

दरम्यान, अंजूचा हिंदुस्थानी पती अरविंदने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “मी अंजूला अजूनही घटस्फोट दिलेला नाही. घटस्फोटाची प्रक्रिया पुर्ण होण्यासाठी 3 ते 5 महिन्यांचा कालावधी लागू शकतो.” कायदेशीरदृष्ट्या घटस्फोट घेतल्याशिवाय अंजूला मुलांचा ताबा मिळणे अशक्य आहे.