शिक्षक स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करा, टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उन्हाळी सुट्टीमध्ये शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उत्तर प्रदेशातील गावी जाण्यासाठी राज्य सरकारच्या प्रयत्नाने आणि मध्य रेल्वेच्या माध्यमातून मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात शिक्षक विशेष ट्रेन सोडली जाते. या विशेष ट्रेनचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करावे, अशी मागणी टीचर्स डेमोक्रॅटीक फ्रंटच्या वतीने करण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेच्या हिंदी माध्यमाच्या शाळांसह इतर खासगी शाळांमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक शिक्षक आहेत. ते उन्हाळी सुट्टीत मोठय़ा प्रमाणावर आपल्या गावी जातात. त्यासाठी दरवर्षी विशेष ट्रेन सोडली जाते. ही ट्रेन विशेषतः बनारस अथवा प्रयागराज या स्थानकापर्यंत आणि तेथून परतीसाठी सोडली जाते. त्यासाठीचे वेळापत्रक एप्रिल महिन्यात जारी केले जाते. मात्र यावेळी अद्याप ट्रेनचे वेळापत्रकच जाहीर न झाल्याने गावी जाणाऱया शिक्षकांचे हाल होत आहेत, असे टीचर्स डेमोक्रॅटिक फ्रंटचे उपाध्यक्ष राजेश पंडया यांनी सांगितले.

उत्तर प्रदेशात प्रत्येक दिवशी जाणाऱ्या रेल्वेगाडय़ांना मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. प्रवाशांना तीन महिने आधी तिकीट आरक्षित करावे लागते. तरीही अनेकांना तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे विशेष ट्रेनच्या प्रतीक्षेत राहिलेल्या शिक्षकांना ऐनवेळी विशेष ट्रेनच्या घोषणा न झाल्यास व अन्य ट्रेनच्या तिकीट न मिळाल्याने गावी कसे जावे, असा प्रश्न पडला आहे.