
संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या संगमेश्वर तालुक्यातील मारळ येथील स्वयंभू श्री देव मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाला आज रविवारपासून आंगवली येथील मार्लेश्वर देवालय येथे दिमाखात सुरूवात झाली असून यावर्षी हा यात्रोत्सव आजपासून १७ जानेवारी दरम्यान साजरा होणार आहे. दि. १४ रोजी श्री देव मार्लेश्वर आणि साखरप्याची गिरिजादेवी यांचा कल्याणविधी (विवाहसोहळा) संपन्न होणार आहे. मकरसंक्रांतीदिनी होणाऱ्या या विवाहसोहळ्याकडे श्री देव मार्लेश्वरावर अगाध श्रद्धा असणाऱ्या लाखो भाविकांचे लक्ष लागून राहिले आहे.
देवरूख शहरापासून अवघ्या १८ कि. मी. अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कडेकपारीत, सभोवताली उंचच उंच कडे व हिरव्यागार वनराईत निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्री देव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे. मार्लेश्वराचे देवस्थान हे १८ व्या शतकातील असून देवस्थानचे मूळ शंकराचे शिवलिंग देवरूख शहरापासून केवळ ३ कि. मी. अंतरावर असणाऱ्या मुरादपूर गावी होते. मात्र तेथील अत्याचाराला कंटाळून शिवलिंगरुपी सत्पुरुषाने जिथे मनुष्यवस्ती नाही व जिथे कोणताही भ्रष्टाचार नाही अशा शांत ठिकाणी जायचे ठरवले. तेथून श्री देव मार्लेश्वर हे आंगवली मठात (पुर्वीचे) आले. त्यानंतर ते सह्याद्रीच्या कपारीत असणाऱ्या एका गुहेत जावून राहिले, अशी अख्यायिका प्रसिद्ध आहे. आंगवली मठाला (आताचे मार्लेश्वर देवालय) आजही अनन्यसाधारण महत्व आहे. मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रोत्सवाचा प्रारंभ प्रथेप्रमाणे याच मठातून (मार्लेश्वर देवालय) होत असतो.
या उत्सवात आज आंगवली मार्लेश्वर देवालय येथे मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, दि. १२ ला सकाळी १० वा. वरद शंकर पूजा, दुपारी ३ ते सायंकाळी ७ वा. खेळ पैठणीचा प्राथमिक फेरी, सायंकाळी ५ वा. ध्वजारोहण, सायंकाळी ७ ते ७.३० दिपोत्सव, ७ ते रात्री ९ वा. मार्लेश्वर देवदेवतांना हळद लावणे व महिलांचे हळदीकुंकू, ९ ते १० वा. महाप्रसाद व मान्यवरांचे स्वागत-सत्कार, १० वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दि. १३ ला. सकाळपासून विविध मानाच्या पालख्यांचे व दिंड्यांचे मार्लेश्वर देवालय येथे आगमन व शिखराकडे प्रस्थान, सायंकाळी ४ ते ७ वा. खेळ पैठणीचा अंतिम फेरी, ७ ते रात्री १० वा. श्री देव मार्लेश्वर यांचे विवाहसोहळ्यास जाण्यापूर्वीचे विविध धार्मिक विधी, रात्री ८ ते १० वा. महाप्रसाद, भोईराज जेवण, मान्यवरांचे स्वागत- सत्कार, रात्री ११.३० वा. मार्लेश्वर पालखीचे विवाहसोहळ्यासाठी शिखराकडे प्रस्थान, दि. १४ ला श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री विवाहसोहळा, दि. १५ ला मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा, दि. १६ ला आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन आणि दि. १७ ला घरभरणीने यात्रोत्सवाची उत्साहात सांगता होणार आहे. मार्लेश्वराच्या या वार्षिक यात्रोत्सवासाठी देवरूख आगारातून जादा बसेस सोडण्यात येतात तसेच मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरूख पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो.






























































