
महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) संभाजीनगर येथील आणखी एका ड्रग फॅक्टरीचा पर्दाफाश केला आहे. डीआरआयने कारवाई करून 107 द्रव्य स्वरूपातील मेफेड्रोन जप्त केले आहे. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत सुमारे 160 कोटी रुपये असल्याचे बोलले जाते
गेल्या आठवडय़ात डीआरआय अहमदाबाद युनिट, गुन्हे शाखा आणि पुणे प्रादेशिक युनिट, अहमदाबाद पोलिसांनी संभाजीनगर येथे छापा टाकून 23 किलो कोकेन, 2.9 किलो मेफेड्रोन आणि 30 लाख रुपये जप्त केले होते. जप्त केलेल्या ड्रगची किंमत सुमारे 250 कोटी रुपये इतकी होती. ड्रगप्रकरणी सूत्रधार आणि कारखान्याच्या मालकासह दोघांना अटक केली होती. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
या गुन्ह्याचा तपास करत असताना डीआरआयला संभाजीनगर येथील आणखी ड्रग फॅक्टरीची (उत्पादन आणि साठा) माहिती मिळाली. डीआरआयचे पथक एका कंपनीत गेले. तेथून 107 लिटर द्रव्य स्वरूपातील मेफेड्रोन जप्त केले. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत सुमारे 160 कोटी रुपये इतकी आहे. ड्रगप्रकरणी डीआरआयने कारखान्याचा मालक आणि गोदामाच्या व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याना अटक केली.
मुंबईत 69 लाखांचा एमडी जप्त
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान आणि कांदिवली युनिटने डोंगरी व मशीद बंदर येथे कारवाई करून 343 ग्रॅम एमडी जप्त केले. जप्त केलेल्या एमडीची किंमत 69 लाखांपेक्षा अधिक आहे. एमडी तस्करी प्रकरणी चौघांना पोलिसांनी अटक केली.
नुकतेच आझाद मैदान अमली पदार्थविरोधी कक्षाने कुर्ला कुरेशी नगर येथे कारवाई करून एकाला ताब्यात घेतले. त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने ते ड्रग्ज डोंगरी परिसरातून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी डोंगरी येथून आणखी एकाला ताब्यात घेऊन अटक केली. दोघांकडून पोलिसांनी 258 ग्रॅम एमडी जप्त केले. दुसरी कारवाई कांदिवली युनिटने केली. मशीद बंदर परिसरातून पोलिसांनी दोघांना अटक केली. अटक आरोपीचे मशीद बंदर परिसरात ताडपत्रीचे दुकान आहे. दुकानाबाहेर ताडपत्री तो विकायला ठेवायचा. तसेच दुकानात ठरलेल्या ग्राहकांना ‘माल आया क्या’ हे कोडवर्ड वापरणाऱयांना ते दोघे एमडी देत असायचे.



























































