अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारप्रकरणी आणखी एकाला गुन्हे शाखेने हरयाणा येथून अटक केली. हरपाल सिंग असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे. त्याला अटक करून ‘मोक्का’ न्यायालयात हजर केले होते.
सलमान खान गोळीबार प्रकरणात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मोहम्मद रफिक चौधरीला अटक केली होती. मोहम्मदच्या चौकशीत हरपालचे नाव समोर आले. तो हरयाणा येथे असल्याचे समजताच पोलिसांचे पथक तेथे गेले. तेथून पोलिसांनी हरपाल सिंगला अटक करून मुंबईत आणले. त्याला ‘मोक्का’ न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. गोळीबार प्रकरणाचा सखोल तपास करणे आवश्यक आहे. त्या तपासादरम्यान हरपालचा गुह्यात नेमका काय सहभाग होता हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. हरपालने मोहम्मदला सलमानच्या घराची रेकी करण्यास सांगितली होती. त्याच्या मोबदल्यात 2-3 लाख रुपये दिले होते अशी माहिती तपासात समोर आली आहे.