लाचखोर क्रीडा मार्गदर्शक एसीबीच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक फोटो

सामना प्रतिनिधी, परभणी

शहरातील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील कार्यरत असलेला क्रीडा मार्गदर्शक बालाजी अनंतराव शिर्षीकर (४५)यास संस्थेच्या व्यायामशाळेतील मंजूर झालेले साहित्य देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणी करुन १० हजार रुपये स्वीकारत असताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.

संस्थेच्या अधीक्षक असलेल्या तक्रारदाराने त्याच्या संस्थेच्या व्यायाम शाळेसाठी मजूंर झालेले साहित्य देण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक लोकसेवक बालाजी शिर्षीकर याने १५ हजार रुपयांची मागणी केली. अशा अशयाची तक्रार लाचलुचपत विभागाकडे देण्यात आली. या तक्रारीमध्ये तथ्य आढळून आल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

यावेळी तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची मागणी करत आणि तो स्वीकारत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर परीक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर व पोलीस उपअधीक्षक एन.एन. बेंबडे, विवेकानंद भारती, हनुमंते अविनाश पवार, गुरसुडकर, धबडगे, अनिल कटारे, जहागिरदार, लक्ष्मण मुरकुटे, चट्टे, मुखीद चौधरी, बोके, टेहरे यांनी सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली.