सात हजाराची लाच घ्यायला गेलेला एजंटच अँटी करप्शनच्या जाळ्यात, चिपळूणमध्ये दुय्यम निबंधकावर गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरेदी खत आणि हक्क सोड नोंदणी करिता दुय्यम निबंधकाने दहा हजार रूपयांची लाच मागितली. अखेर तोडजोडीनंतर सात हजार रूपयांची लाच देण्याचे ठरले. खासगी व्यक्तीला पाठवून ही लाच घेत असताना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून रंगेहात पकडले आहे. दुय्यम निबंधकासह त्याच्या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना चिपळूण येथे घडली.

खरेदी खत आणि हक्क सोड नोंदणीसाठी चिपळूणचे दुय्यम निबंधक श्रेणी 1 चे प्रशांत धोत्रे यांनी दहा हजाराची लाच मागितली होती. त्यानंतर आज दस्त नोंदणीचे साडे चार हजार आणि त्यापूर्वी केलेल्या नोंदी याचे मिळून सात हजार रूपयांची लाच घेण्याचे ठरले. त्यानंतर धोत्रे यांनी खासगी व्यक्ती अरविंद पडवेकर याला पैसे घेण्यासाठी पाठवले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून त्याला रंगेहाथ पकडले. प्रशांत धोत्रे आणि अरविंद पडवेकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीचे उपअधीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने केली.