
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्टर्स लावल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 100 फिर्यादी दाखल केल्या आहेत. या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना अटकही करण्यात आली आहे. दिल्लीचे विशेष आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी ही माहिती दिली आहे. सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण आणि छापखाना कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दिल्लीच्या विविध भागांमध्ये ‘मोदी हटाओ देश बचाओ’ असा मजकूर असलेली पोस्टर चिकटवण्यात आली आहेत. अशी जवळपास 2 हजार पोस्टर फाडण्यात आली आहेत तर 2 हजार पोस्टर लावण्यापूर्वीच एका व्हॅनमधून ताब्यात घेण्यात आली आहेत.
दिल्लीतील आप मुख्यालयाकडून एका गाडी आय.पी. इस्टेट भागात आली असता पोलिसांनी तिला अडवलं आणि तिच्या चालकाला अटक केली. या गाडीमध्ये मोदींविरोधातील पोस्टर सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी म्हटलंय की चालकाच्या मालकाने त्याला ही पोस्टर आपच्या मुख्यालयात पोहचवायला सांगितली होती. आपण एक दिवस आधी देखील काही पोस्टर पोहचवली असल्याचे या चालकाने सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चालकाच्या माहितीवरून पोलिसांनी आणखी 3 जणांना अटक केली आहे.
पोलिसांनी म्हटलंय की 2 मुद्रण कंपन्यांना प्रत्येकी 50 हजार पोस्टर छापण्याची ऑर्डर देण्यात आली होती. या कंपनीशी निगडीत कर्मचाऱ्यांना ही पोस्टर लावण्याचेही काम देण्यात आले होते. यातली काही पोस्टर रविवारी रात्री चिकटवण्यात आली होती. ही पोस्टर छापणाऱ्या कंपनीच्या मालकालाही अटक करण्यात आली आहे. पोस्टरवर प्रिंटीग प्रेसचं नाव न छापल्याबद्दल त्यांना अटक करण्यात आली आहे.



























































