
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 20 ऑगस्टला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या बलिदानानंतर त्या वेळच्या सरकारने जादूटोणाविरोधी कायदा राज्यात लागू केला. आजअखेर राज्यात तीन वेळा सरकार बदलले. मात्र, कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नियम करण्यासाठी अजून कोणत्याही सरकारला वेळ मिळाला नाही. आता सत्तेत आलेले सरकार तरी हे नियम करणार का? असा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे हमीद दाभोलकर आणि प्रशांत पोतदार यांनी उपस्थित केला आहे.
दाभोलकर म्हणाले, ‘राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये म्हैसाळ येथील नऊजणांचे हत्याकांड, सातारा येथील गुप्तधनाच्या लालसेमधून झालेल्या नरबळीचा छडा लागणे, पुणे येथील गुप्तधनासाठी बळी देण्याचा प्रयत्न करणाऱया लोकांना अटक, नागपूर येथील पाच वर्षांच्या बालकाचा भुताने झपाटले म्हणून नातेवाईकांनी केलल्या मारहाणीत झालेला मृत्यू अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी जादूटोणाविरोधी कायद्याचे नियम तातडीने तयार करावेत.’ कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कायद्याअंतर्गत नमूद केलेल्या दक्षता अधिकाऱयांचे प्रशिक्षण घेणे हेही अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जिह्याच्या पातळीवर जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक नोडल पोलीस अधिकारी नेमणे आवश्यक आहे.
डॉ. दाभोलकर स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम
ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा स्मृतिदिन हा ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यानिमित्त विविध राज्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसाराचे कार्यक्रम होणार आहेत. महाराष्ट्राच्या विविध जिह्यांतून 20 ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता निर्भय मॉर्निंग वॉक काढणे, राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनानिमित्त शाळा-कॉलेजमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनावर सप्रयोग व्याख्यान देणे व इतर कार्यक्रम होणार आहेत.































































