
सामना प्रतिनिधी, मुंबई
लैंगिक शोषणाचे आरोप असलेले गायक- संगीतकार अन्नू मलिक यांना इंडियन आयडॉल 10 च्या परीक्षक पदावरून हटवण्यात आले आहे. पार्श्वगायिका सोना मोहापात्रा, श्वेता पंडित यांच्यासह आणखी दोन उभरत्या गायिकांनी अन्नू मलिक यांच्या लैंगिक गैरवर्तणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या पार्श्वभूमीवर सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
मी टू मोहिमेअंतर्गत मलिक यांच्यावर जेव्हापासून आरोप होऊ लागले, तेव्हापासून त्यांच्या सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजन टीमच्या कराराविषयी चर्चा सुरू झाली होती. अखेर चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना परीक्षकपदावरून हटवण्यात आले आहे. सोमवारपासून मलिक कोणत्याही भागाचे शूटिंग करणार नाहीत. त्यांच्या जागी परीक्षक म्हणून दिग्गज संगीतकारांना आमंत्रित करण्यात येईल. सध्या विशाल दादलानी आणि नेहा कक्कर हे रिऑलिटी शोचे परीक्षक आहेत. गायिका सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडित यांच्यानंतर आता आणखी दोन महिलांनी संगीतकार-गायक अनू मलिक यांच्याकर आरोप केले आहेत.
1990मध्ये मेहबूब स्टुडिओमध्ये मलिक यांना भेटायला गेले असता त्यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याआधीही मोठय़ा गायकांसोबत गाण्याची संधी देण्यासाठी किस मागितल्याचा आरोप श्वेता पंडितने केला होता. दरम्यान मलिकने सोना मोहापात्रा आणि श्वेता पंडितचे आरोप फेटाळून लावले आहेत. मी टू मोहिमेचा वापर मोठय़ा व्यक्तीच्या चारित्र्यावर घाला घालण्यासाठी केला जातोय, असे वक्तव्य मलिक यांच्या वकिलाने केले आहे. गीतकार समीर अंजान हे मलिक यांच्या बचावासाठी पुढे आले आहेत. श्वेता पंडित यांनी ज्या घटनेचा उल्लेख करून आरोप केलाय, त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो, असे ट्विट समीर यांनी केलंय.
summary- anu malik removed from indian idol
























































