
प्रशांत गौतम << [email protected]>>
महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या ‘कदाचित अजूनही’ या काव्यसंग्रहाला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनुराधाताईंच्या कवितांमध्ये चिंतनात्मक भाव जसे दिसतात तशा स्त्रियांच्या भावना आणि जाणिवा यांचेही हळुवार प्रतिबिंब पडलेले दिसते. मागील चार दशकांपासून या ‘भाषाभगिनी’ची साहित्यसेवा सुरू आहे.
ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांचे काव्यलेखन, संस्थात्मक कार्य या क्षेत्रात चार दशकांचे भरीव योगदान आहे. कविसंमेलनाच्या व्यासपीठावर फार मिरवणे त्यांना पसंत नाही. मराठवाडा साहित्य संमेलन असो की अखिल भारतीय साहित्य संमेलन असो. अध्यक्षपदाची योग्यता असूनही त्यांनी त्यासाठी फार उत्साह कधी दाखवला नाही. चोवीस वर्षांत चार कवितासंग्रह आहेत. पाचवा संग्रह तर एक तपानंतर आला. अशा या क्रतस्थ कवयित्रीने अनुवाद आणि अन्य राज्यांत झालेल्या विविध कविसंमेलनांत मराठीचे प्रतिनिधित्व प्रदीर्घ काळ केले. या माध्यमातून त्या भाषा भगिनी झाल्या. साहित्य अकादमी पुरस्कार घोषित व्हायच्या फार आधीपासून त्यांचे लेखनकार्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर वाचकमान्य ठरले आहे. त्यांना मिळालेल्या या सर्वोच्च पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या साहित्य क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. साहित्य अकादमीचा सन्मान मराठवाडय़ात आजपर्यंत ना.धों. महानोर, आसाराम लोमटे, श्रीकांत देशमुख यांना त्यांच्या साहित्यकृतीसाठी मिळाला. अनुराधा पाटील यांच्या निमित्ताने मराठवाडय़ातील स्त्री लेखिकेचाही गौरव झाला. त्यांचे दिगंत, तरीही, दिवसेंदिवस, वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ हे चार कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘कदाचित अजूनही’ हा कवितासंग्रह 2017 साली प्रकाशित झाला. अनेक वाङ्मयीन नियतकालिकांत त्यांच्या कविता प्रसिद्ध होत असत. त्यातील काही कविता 1981 सालच्या ‘दिगंत’ या पहिल्या कवितासंग्रहात आल्या. अल्पाक्षरी, लयबद्ध आणि प्रतिमांच्या गडद प्रभावाखाली स्वत्वाची चाचपणी पहिल्या संग्रहातील कवितावाचकांच्या भेटीस येते. 1985 साली त्यांचा दुसरा कवितासंग्रह आला. त्यात त्यांनी स्त्र्ााr दुःखाच्या आदिम तत्त्वाचा शोध घेतला व संयतपणे मानवी मनाच्या तळाचा शोध घेतला. 1991 साली आलेल्या ‘दिवसेंदिवस’ या कवितासंग्रहाने तर कवितेचा पोत आणखी प्रगल्भ केला. चौथा कवितासंग्रह ‘वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ’ 2005 साली आला. या संग्रहामुळे त्यांची कविता स्वतंत्र प्रतिमेची असल्याचे सिद्ध झाले तर पाचवा संग्रह येण्यासाठी तब्बल एक तप लागले. हे चार कवितासंग्रह चिंतनात्मक, स्रियांच्या भावभावना आणि जाणिवा हळुवारपणे मांडणारे आहेत. कवितेच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःची वाट शोधली, त्याचबरोबर समकालीन मराठीच्या क्षेत्रात प्रतिभासंपन्नता त्यांच्या कवितेतून व्यक्त झाली. पाचही संग्रहांतील अनेक कविता या काव्यविषयक भूमिका मांडणाऱ्या व जाणिवांचा पट अधिक व्यापक करणाऱ्या आहेत. अनुराधा पाटील यांचं कवितेचं नातं असं ऋणानुबंधाचे असल्याचे पावलोपावली जाणवत जाते. खरे तर आयुष्य ही न संपणारी कविता असते. डोळय़ांसमोर पसरत जाणारे अनंत मोकळे आकाश असते.
कदाचित अजूनही या संग्रहात त्याची अशीच एक लक्षवेधी कविता आहे.
तीन पावलांत…
तीन पावलांत पृथ्वी
व्यापणाऱ्या
वामनाच्या पावलांसारखी
कवितेची महाकाय पावलं
आयुष्यावरून
चालत गेल्याची गोष्ट
मी सांगत असते
स्वतःलाच रात्री बेरात्री
आणि कागदावर
कोवळा अंगठा उमटवणाऱ्या
पोरींच्या बोटांवरची
सजीव अक्षरं
फेर धरतात भोवती
खान्देशात जामनेर तालुक्यातील पहूर हे अनुराधा पाटील यांचे जन्मगाव. तिथे दहावीपर्यंत शिक्षण झाले. शालेय वयात असल्यापासूनच त्यांचा काव्यलेखन प्रवास सुरू झाला. काव्यस्पर्धा/निबंध लेखन स्पर्धा यात त्यांचा सहभाग असे. मराठीचे प्राध्यापक असलेल्या प्रा. कौतिकराव ठाले पाटील यांच्याशी विवाह झाल्यानंतर पुढच्या लेखनाची प्रेरणा पतीकडून मिळत गेली. खान्देशातील खेडय़ातून सुरू झालेला लेखनप्रवास नंतरच्या काळात संभाजीनगर येथे विस्तारला. अनुराधा पाटील यांची कविता हिंदी, इंग्रजी, उडिया, पंजाबी, राजस्थानी, जपानी अशा अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली. हे अनुवाद त्या त्या भाषेतील प्रमुख नियतकालिकात झाले. एवढेच नव्हे तर देशपातळीवरील महत्त्वाच्या कवींच्या इंग्रजी/हिंदी प्रातिनिधिक संग्रहात प्रसिद्ध झाले. ‘दरअसल’ हा अनुवाद प्रा. निशिकांत ठकार यांनी केला, त्याचा उल्लेख यानिमित्ताने अगत्याचा ठरतो. जागतिक लेखक संमेलनात दोन वेळा मान्यवर मराठी कवी म्हणून त्यांनी पाश्चिमात्य, पौर्वात्य देशांतील निरनिराळय़ा भाषांतील कवीसोबत प्रतिनिधित्व केले. काव्यविषयक चर्चासत्र, बहुभाषिक कविसंमेलन त्यांचा सहभाग असतो. कोडी केरळ येथील साहित्य महोत्सवात आणि बंगळुरू येथे झालेल्या कविता महोत्सवास त्या हजर होत्या. याशिवाय दिल्ली, गोहाटी, भोपाळ, कांची, पणजी, राऊरकेला, इंदूर, अहमदाबाद, वाराणसी येथे त्यांना मराठी भाषेतील कवी प्रतिनिधित्व म्हणून सहभागाची संधी मिळाली. त्याचप्रमाणे त्यांच्या अनेक कविता, कवितासंग्रह महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील विद्यापीठ अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत. शिवाय पाचेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या कवितेचा अभ्यास पीएच.डी. आणि एम. फिलसाठी केला. त्यांच्या समग्र कवितेवर जळगाव विद्यापीठात आणि मराठवाडा साहित्य परिषदेत चर्चासत्रही आयोजित झाले होते. ‘अनुराधा पाटील यांची कविता’ हा ग्रंथ डॉ. दादा गोरे यांनी संपादित केला आहे. साहित्य अकादमीचा पुरस्कार हा अनुराधाताईंमधील ‘व्रतस्थ कवयित्री’चा गौरवच आहे.




























































