
सामना प्रतिनिधी । चिरनेर
जपानची राजधानी टोकियो शहरात राककतें मोबाईल नेटवर्क या कंपनीमध्ये डेटा सायंटीस्ट म्हणून उरण तालुक्यातील जसखार गावची सुकन्या प्रणाली मढवी हिची नियुक्ती झाली आहे. येत्या १ ऑगस्टपासून ती कामावर रुजू होणार आहे. प्रणालीच्या या उत्तुंग भरारीचा तिचे आई-वडील, नातेवाईक यांच्याबरोबरच तालुक्यातील व गावातील नागरिकांना सार्थ अभिमान वाटत आहे.
प्रणालीचे शालेय शिक्षण जेएनपीटी विद्यालयात झाले. लहानपणापासूनच ती अभ्यासात हुशार होती. या यशात शालेय शिक्षकांचा फार मोठा वाटा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षिका प्रमिला पवार यांचा प्रभाव जास्त आहे. प्रणालीने एमटेकचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर नवी मुंबईतील रिलायन्स कंपनीत दोन वर्षे नोकरी करून ४ जी मोबाईल विभागात संशोधन केले. या कामाची पोचपावती म्हणून प्रणालीचे जपान येथील ५ जी कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून वर्णी लागली आहे. प्रणालीच्या या यशाबाबद्दल उरणचे व जसखार गावाचे नाव मोठे होऊन तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

























































