AI चा वापर करून महिलांचे नग्न फोटो तयार करणाऱ्या अ‍ॅपचा वापर वाढला, पॉर्न बनवण्यासाठीही होऊ लागला वापर

रश्मिका मंदाना, सारा तेंडूलकर, आलिया भट्ट, प्रियांका चोप्रा इ. यांचे डिपफेक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजेंसीचा कशा पध्दतीने गैरवापर केला जाऊ शकतो याची सर्वांनाच खात्री पटली असेल. याच AI चा वापर करुन आता महिलांचे नग्न फोटो तयार करणाऱ्या अ‍ॅपचा वापर वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पॉर्न व्हिडीओ बनवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

ग्राफिका (Graphika) नावाच्या एका सोशल नेटवर्क अ‍ॅनालिसिस कंपनीने यासंदर्बातील एक अहवाल जारी केला आहे. या अहवालामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी उघड झाल्या आहेत. अहवालानुसार, AI तंत्रज्ञानाच्या मदतीने महिलांचे नग्न फोटो तयार करणाऱ्या अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सची लोकप्रियता वेगाने वाढत आहे. ग्राफिकाने केलेल्या सर्वेक्षणानुसार, सप्टेंबर महिन्यात 2.4 करोड वापरकर्त्यांनी अशा वेबसाईट्सला भेट दिली आहे. यापैकी बहुतांश वेबसाईट्सचा वापर ‘न्युडिफाई’ सेवांचे मार्केटिग करण्यासाठी केला जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर अशा लिंक्सच्या जाहिरातींमध्ये 2400 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

जाहीरातींसाठी x आणि Reddit  

सर्वेक्षणानुसार, नग्न फोटो तयार करणारी अ‍ॅप्स आणि वेबसाईट्स सोशल मिडीया माध्यमे x आणि Reddit यांचा जाहीरातींसाठी मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. वेबसाईट्स आणि अ‍ॅप्सच्या सहाय्याने एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या फोटोचं रुपांतर नग्न फोटो मध्ये केलं जाऊ शकतं. विशेष म्हणजे महिलांचे फोटो काढून त्यांचे नग्न फोटो तयार केले जाऊ शकतात. या अ‍ॅप्सचा वापर करुन महिलांचे नग्न फोटो पाहता येतील, अशा आशयाची जाहिरात केली जात आहे.

AI तंत्रज्ञान जेवढे चांगले आहे तितकेच घातक आहे. अवैध पोर्नोग्राफी बऱ्याच काळापासून इंटरनेटवर उपलब्ध आहे. विशेषत: प्रसिध्द व्यक्तींच्या चेहऱ्यांचा पोर्नोग्राफीमध्ये आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता AI मुळे ते अजून सोपे झाले आहे असेच म्हणावे लागेल. येत्या काळात सूडभावनेच्या हेतून AI चा गैरवापर मोठ्याप्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.