परीक्षण- गूढरम्य अंतरंगाचा वेध

 

>> आराधना कुलकर्णी 

 

 

कथारूप महाभारत माहीत नाही असे  कुणीही नसेल. याचे कारण महाभारत व  सहस्रावधी पिढय़ांना जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवणारी भगवद्गीता ही हिंदुस्थानी संस्कृतीची अभिन्न अंगे आहेत. महाभारतावर आजवर विपुल व विविधांगी  लेखन झाले आहे. त्यात आणखी एक सुंदर भर पडली आहे ती म्हणजे ‘गोष्टीपलीकडचे महाभारत’ हे स्वाती काळे लिखित पुस्तक होय. पुस्तकात एकूण वीस वैशिष्टय़पूर्ण ललित लेख आहेत. सामान्यत विशेष परिचित नसणारे, पण महत्त्वाच्या घटितांना कारणीभूत ठरलेले प्रसंग काही लेखांचे विषय आहेत.

‘महाभारतातील जन्मरहस्ये’ या लेखात  सत्यवती, भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, पांडव यांच्या जन्मरहस्यांचा वेध घेतला आहे. त्यामागे व्यासांची भूमिका काय असावी याबाबत लेखिका म्हणतात, व्यासांनी ही मोठय़ा व्यक्तिमत्त्वांची जन्मरहस्ये रूपकात्मक  भाषेत सांगितली आहेत. सत्यवतीची कथा विस्ताराने  सांगून त्या आपले भाष्य मांडतात की, सत्यवती कोळ्याची मुलगी असावी व  वर्णव्यवस्थेत तिला उच्च स्थान देण्यासाठी व्यासांनी ही कथा रचली असावी.

हिमालयापलीकडील स्वर्गसुंदर प्रदेशाचे अद्भुतरम्य वर्णन ‘उत्तराकुरू’ या लेखात आहे. प्रलयकथा सांगणारा ‘मन्वंतर’, अनेक ध्वजपताकांचे वर्णन करणारा ‘ध्वजपताका’ तसेच तत्कालीन निसर्ग, प्राणी, नद्या, पशुपक्षी यांचे वर्णन करणारे ‘प्राण्यांचे महाभारत’, ‘उलुकम् घोर दर्शनम्’, ‘मृग-स्वप्नभय’, ‘पशुपक्ष्यांचे हितगुज’, ‘शमी वृक्ष, स्मशान व युद्धभूमी’ हे लेख नवीन व विपुल माहिती देणारे रंजक लेख आहेत. अर्जुन तपश्चर्या करत असताना त्याला कृष्णाने नवगुंजार या नऊ प्राण्यांच्या अवयवांपासून निर्माण झालेल्या प्राण्याच्या रूपात दर्शन दिले ही कथा, आदिपर्वातील नागाच्या 184 प्रजाती, उच्च व नीच प्रतीच्या घोडय़ाची लक्षणे, हत्ती तसेच ‘शांती पर्वा’त भीष्माने सांगितलेल्या प्राण्यांच्या अनेक रोचक कथा यांचा उल्लेख यात आहे.

द्यूत ही महाभारतातील प्रमुख घटना. ‘नियतीचा द्यूतपट’ या लेखात ही सर्वज्ञात कथा सांगतानाच इतर अनेक आनुषंगिक उपकथानके तसेच त्यांची माहिती, राजकीय महत्त्व या बाबींवर प्रकाशझोत टाकला आहे. ‘मयसभा आणि देवसभा’ या लेखात मयसभेचे तसेच इंद्रसभा, ब्रह्मसभा, यमसभा, वरुणसभा इत्यादी आकाशात विहार करणाऱया वैभवशाली सभांचे रोचक व अद्भुत वर्णन आहे.

काही लेखांमधून तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर  प्रगल्भ बुद्धी व स्वतंत्र विचारसरणीच्या महत्त्वपूर्ण स्त्राr व्यक्तिरेखा भेटतात. परिस्थितीमुळे अनेक दुःखे भोगावी लागली तरी त्यांनी खंबीरपणे त्यांचा सामना केला. ती सशक्त मानसिकता या लेखांमधून अधोरेखित झाली आहे. द्रौपदी ही असहाय्य अबला नसून एक तेजस्विनी विदुषी होती. तिची विद्वत्ता ‘द्यूत पर्वा’त तिच्या वाक्चातुर्यामुळे सिद्ध झाली आहे.

अंबेला भीष्मवधाची प्रतिज्ञा पूर्ण करायची आहे, तर गंगामातेला आपल्या पुत्राचे संरक्षण करायचे आहे. त्या दोघींतील संघर्ष ‘अंबा आणि गंगा’ या लेखात बघायला मिळतो. ‘मी मानिनी, मी स्वामिनी’ या लेखात इंद्राकडे  प्राजक्त मागताना समानतेचा आग्रह धरीत सत्यभामा म्हणते, ‘’जर हे झाड समुद्रमंथनातून बाहेर निघाले आहे तर त्यावर एकाचाच हक्क का? मालमत्ता सर्वांची असताना फक्त देवानेच का फायदा घ्यावा?” ‘कृष्णाचा पांचजन्य’मध्ये कृष्णाने तो शंख कसा मिळवला याची रोचक कथा आहे. प्रत्येक जीवनप्रवाह स्वतंत्र व वैविध्यपूर्ण असतो. तथापि त्यात काही साम्यस्थळेही आढळतात. भिन्न काळातील अशीच काही विस्मयकारक साम्यस्थळे लेखिकेने शोधली आहेत. उदा. ‘विराट पर्वा’त कौरवांशी युद्ध करण्यास राजकुमार उत्तर कच खातो तेव्हा त्याला बृहन्नडा रूपातील अर्जून युद्धप्रवृत्त करतो, तर पुढे ‘भीष्म पर्वा’त कच खाणाऱया अर्जुनाला श्रीकृष्ण कर्मयोग सांगून युद्धप्रवृत्त करतो. हा समान धागा पकडून लेखिका असे भाष्य करतात, “असेही असेल की, ‘भगवद्गीते’तील कर्मयोगाचे बीज व्यासांनी ‘विराट पर्वा’तील या दृश्यात पेरले असेल व पुढे ‘भीष्म पर्वा’त हे बीज अंकुरून त्या गहनगूढ गीतेचा वटवृक्ष झाला असेल.” असेच वैदिक काळातील कवष ऐलुष ऋषी, नंतर नलराजा व नंतर युधिष्ठिर या तिघांच्या जीवनातील द्यूत ाढाrडेचा प्रभावी समान धागा, दमयंती व द्रौपदी यांच्या दोघींच्या जीवनातील काही समान प्रसंग आपल्या निदर्शनास येतात व आपण विस्मयचकित होतो.

लेखांचे स्वरूप ललित व कथात्मक आहे, तसेच त्यांना उच्च दर्जाचे वैचारिक मूल्यही लाभले आहे. समृद्ध भाषा या पुस्तकाचे बलस्थान आहे. ठिकठिकाणी  प्रतिमा, प्रतीकांचा अलंकारिक झगमगता वापर, कधी तरल, हळुवार, संवेदनशील शब्दरचना यामुळे  ‘महाभारत’  नुसताच धार्मिक ग्रंथ नसून एक महाकाव्य आहे याचीही प्रचीती येत राहते. अनेकदा हे गद्य लेखन काव्यात्म पातळीवर पोहोचते. ‘कवचकुंडले’ आणि ‘उलुकम् घोर दर्शनम्’ हे दोन लेख याची उत्तम उदाहरणे आहेत.

लेखिकेवर महाभारताचे व महर्षी व्यासांच्या काव्यप्रतिभेचे गारुड आहे हे त्यांनी मनोगतात सुंदररीत्या व्यक्त केले आहे. ‘महाभारत सतत आवर्तनांमध्ये घडत असते. कधी जगात घडणारे, कधी मनात घडणारे  आपले स्वतचे महाभारत असते’ या वाक्याने पाच हजार वर्षांपूर्वीचे हे महाकाव्य वर्तमान काळाशी व आपल्याशी किती सहजपणे जोडले गेले आहे.

गोष्टींच्याही पलीकडची गोष्ट शोधणारे, वैचारिकतेची झालर लाभलेले, लालित्यपूर्ण ‘गोष्टीपलीकडचे महाभारत’ आवर्जून वाचावे असे आस्वादमूल्य त्याला आहे.

गोष्टीपलीकडचे महाभारत (प्रथम आवृत्ती)

लेखिका : स्वाती काळे

प्रकाशक : भरारी प्रकाशन

पृष्ठे : 120, मूल्य : 200/- रुपये