
>> अर्चना मिरजकर
मराठेशाहीच्या सुवर्णकाळात शाहीरांनी जसे वीरश्रीला आव्हान देणारे पोवाडे लिहिले तसेच शृंगार रसयुक्त लावण्यादेखील लिहिल्या. पोवाडय़ांप्रमाणेच लावण्यांचं स्फूर्तीस्थान भोवतालच्या जीवनात आहे. संसारिक सुखाची उत्कट इच्छा, विलासी वृत्तीचा रंगेलपणा आणि प्रेमाची बेहोशी त्यातून झळकते. विशेषतः दुसऱया बाजीरावाच्या काळात प्रचलित असलेल्या सुखवस्तू आणि विलासी जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर त्या काळच्या शूर, पण रंगेल सरदारांचं चित्रण आणि त्यांच्या प्रेमाच्या कहाण्यांचे वर्णन यातून येते. म. ना. अदवंत यांच्या ‘पैंजण’ या पुस्तकात प्रसिद्ध शाहीरांच्या लावण्यांचं संकलन आहे. लावण्यांचा विशेष असा की, हे शृंगारिक वर्णन संस्कृत काव्यांच्या धर्तीचे सांकेतिक किंवा राधा-कृष्ण यांसारख्या
पौराणिक व्यक्तींच्या जीवनावर आधारित नसून, यातील शृंगार अस्सल मराठमोळ्या तरुण-तरुणींचा आहे. त्यातील नायक-नायिका मराठीरूपात आपल्यासमोर येतात.
नाजुक बांधा सडक आकृती ठेंगणी गोजिरी।
पंगणीदार पगडी शिरी।।
पंठीदार अंगरखा, दुपेटा भरनक्षी भरजरी।
मस्तकी गंध केशरी।।
अशा ऐटीत लावणीतील नायक आपल्या समोर येतो. स्त्राr सौंदर्याचे वर्णन करताना शाहीरांनी पारंपरिक संकेत झुगारून, नवीन अलंकार सृष्टी निर्माण केली. एका नायिकेचे वर्णन पहाः
गगनात चांदणी ठळक मारिशी झळक उभी गं अंगणी।
किती नटुन थटुन मारिशिल छनाछन नयनाच्या संगिनी।।
किंवा होनाजी बाळांच्या लावणीतील नायिकेचं हे चित्रण प्रसिद्ध आहेः
लटपट लटपट तुझं चालणं मोठय़ा नखऱयाचं।
बोलणं मंजुळ मैनेचं।
तसाच होनाजींच्या लावणीतील नायिका नायकाचं वर्णन करताना म्हणतेः
शिरी पगडी पंगणीदार आंगावर ज्वाहार कुठील राहणार कोण परगणा जी। तुमचा वारू बहुरंगी चतुर शहाणा जी।।
काही शाहीरांनी कृष्णाच्या जीवनावर लावण्या रचल्या आहेत, नाही असे नाही. पण त्यातील कृष्ण आणि गोपिका पूर्ण मराठी वळणाच्या दिसतात. तसेच, काही लावण्यांमध्ये शृंगाराऐवजी वात्सल्य किंवा करुण रसाचाही आविष्कार होतो. होनाजी बाळा यांची घनश्याम सुंदरा श्रीधरा ही कविता प्रसिद्धच आहे. यात कृष्णाला जागे करणाऱया यशोदेच्या स्वरात पहाटेचे रम्य वर्णन येते.
सामान्य स्त्राr-पुरुषांच्या जीवनावर रचलेल्या असल्यामुळे, लावण्यांमध्ये प्रणयाचे अनेक बारकावे पाहायला मिळतात. पती मोहिमेवर गेलेला असल्यामुळे भासणारी विरहाची व्याकुळता, पती येणार असे कळताच नायिकेची उडलेली तारांबळ आणि आनंद, मीलनाची अधिरता, रुसवे-फुगवे अशा अनेक छटा लावण्यांमधून दिसून येतात.
पति प्रवासामध्ये सखे मी येकली मांदिरी।
पंठू कोणाच्या बळे पाठवा पत्र लिहुन या तरी।। किंवा
या प्राणविसाव्या वाचून हा जीव पिसा।
रुसला साजण समजेल आता गं बाई कसा।।
शृंगाराचे वर्णन करताना काही शाहीरांनी अतिरेक केला. सूचकता सोडून त्यांनी काही ठिकाणी भडक आणि उत्तान वर्णन केले. यामुळे लावणी या संपूर्ण काव्य प्रकारालाच अप्रतिष्ठा प्राप्त झाली. परंतु असे अपवाद सोडल्यास शाहीरांचे काव्य अनेक कल्पनाविलास, सुंदर निसर्गवर्णने आणि व्यक्तिचित्रणाचे बारकावे यांनी नटले आहे.
बहार हा झाला रात्री मोतीया फुलला।
द्राक्षीचे मंडप बाई छाया अति दाट गं।
पाचव्या मजल्यावरती सफेतीचा थाट गं।
पडदे चिकाचे भंवते मधी चोरवाट गं।
शाहीरांचे जनमानसाचे निरीक्षण किती सूक्ष्म होते हे करुण रस व्यक्त करणाऱया लावण्यांतून दिसून येते. निपुत्रिकेचे दुःख वर्णन करताना शाहीर होनाजी बाळा म्हणतात- हिण माझे प्रारब्ध वांझपण कधी फिटेल बाई। एक बाळक पोटी नाही।। किंवा
नाही पुत्रफळ पोटी म्हणून बाई अगदीच झाले लिन।
वाळवंटी तळमळी जसा गं बाई पाण्यावाचुन मीन।।
कितीतरी शाहीरांचे भाषेवर किती प्रभुत्व होते हे रामजोशी यांच्या या लावणीवरून दिसून येईल.
श्रीरंग गोपिकोत्संग धरुनी करि रंग हरी हा बाई
पुंजात मातला वसंत सांगू मी काई
तो पुंजरसाचा पुंज बांधिला गुंज तशामधि मुरली
अति मंजुळ हरिने वदन सरोजी धरली
यात किती मधुरपणे त्यांनी अनुप्रास साधला आहे.
लावणी हा अस्सल मराठी काव्यप्रकार लोककलांमधून निर्माण झाला. त्यात तत्कालीन सामान्य जनांचे चित्रण आले आणि सामान्य जनतेसाठी त्यांचा आविष्कार झाला. शिवाय या काव्याने इतर कला आविष्कारांना जन्म दिला. या सर्व विशेषणांमुळे हे काव्य आगळे ठरते. मराठी साहित्याच्या पगडीत आणखी एक तुरा खोवते.
ब्लर्ब – म. ना. अदवंत यांच्या पैंजण या पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी पहा YouTube/@Granthaytra भाग 11.




























































