
आशिया चषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाचा विजयरथ सुरुच आहे. पहिल्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पाणी पाजल्यानंतर दुसऱ्या लढतीत दुबळ्या हाँगकाँगवरही टीम इंडियाने दणदणीत विजय मिळवला. बुधवारी झालेला हा सामना टीम इंडियाने 40 धावांनी जिंकला. सूर्यकुमार यादव या विजयाचा नायक राहिला. त्याने अवघ्या 26 चेंडूत 68 धावांची तुफानी खेळी केली. 261.53 च्या जबरदस्त स्ट्राईक रेटने त्याने या धावा काढल्या. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कारही मिळाला.
हाँगकाँगविरुद्ध टीम इंडियाने प्रथम फलंदाजी केली. पाकिस्तानविरुद्ध भोपळाही फोडू न शकलेल्या केएल राहुलने या लढतीमध्ये 36 धावा केल्या. मात्र यासाठी त्याने 39 चेंडू खर्ची घातले. 92.31 च्या साधारण स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये एवढ्या कमी स्ट्राईकरेटने धावा केल्याने तो सोशल मीडियावर ट्रोल झाला. क्रीडाप्रेमी त्याला संघातून बाहेर काढण्याची मागणी करू लागले. याच दरम्यान सामना संपल्यानंतर पत्रकार परिषद घेण्यासाठी आलेल्या सूर्यकुमार यादव यालाही हा प्रश्न विचारण्यात आला.
केएल राहुलला संघातून बाहेर काढायला हवे का असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. हा प्रश्न ऐकून आधी सूर्यकुमार मनमोकळेपणाने हसला. त्यानंतर त्याने तर तुम्ही म्हणताय की केएल भाईला खेळवले नाही पाहिजे, असे म्हटले आणि पुन्हा हसू लागला. त्यानंतर तो म्हणाला की, माझे असे मत आहे की केएल राहुल दुखापतीतून सावरून नुकताच संघात आला आहे. त्याला थोडा वेळ द्यायला हवा.
Om shanti for Gully Cirkit expurts #KLRahul #AsiaCup2022 pic.twitter.com/gpsjI5kbk0
— Lordgod_KLRahul (@LordGod188) September 1, 2022
सूर्यकुमारची आतषबाजी
हाँगकाँगसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम इंडियाने धावांचा डोंगर उभारला. 20 षटकामध्ये टीम इंडियाने 2 बाद 192 धावा केल्या. सूर्यकुमार यादव याने 68 धावांची आक्रमक खेळी केली. त्याला विराट कोहली याने नाबाद 59 धावा काढत उत्तम साथ दिली.
हाँगकाँगची झुंज
193 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हाँगकाँगने टीम इंडियाला शेवटच्या षटकापर्यंत झुंजवले. या नवख्या संघाने टीम इंडियाच्या धारधार गोलंदाजीचा यशस्वी सामना केला आणि 20 षटकात 5 गडी गमावत 152 धावांपर्यंत मजल मारली. बाबर हयात याने सर्वाधिक 40 तर किंचित शहा याने 30 धावा केल्या. हाँगकाँगवरील या विजयामुळे टीम इंडियाने सुपर-4 मध्ये प्रवेश केला आहे.




























































