मृत्यूच्या अफवेने भडकला मॅराडोना

17

नवनाथ दांडेकर | मुंबई

अर्जेन्टिनाचा महान सुपरस्टार दिएगो मॅराडोना सध्या त्याच्या मृत्यूची अफवा व्हाटस अँपवर पसरविणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेतोय. या अफवेबाजाचा शोध लावणाऱ्याला मॅराडोनाने १० हजार अमेरिकन डॉलर (सुमारे ७ लाख रुपये ) इतके मोठे इनामही लावले आहे. मॅराडोना खेळाडू म्हणून जितका महान आहे तितकाच आपल्या संघाचा कट्टर चाहता आहे. २१व्या विश्वचषकात बादफेरीसाठी संघर्ष करणारा मेस्सीचा अर्जेन्टिना संघ नायजेरियावर रोमांचक विजय मिळवून उपउपांत्यपूर्व फेरीत पोचला.या विजयाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला मॅराडोना अर्जेन्टिनाच्या यशाने इतका आनंदित झाला कि हा शॉक सहन न झाल्याने तो स्टेडियममध्येच भोवळ येऊन पडला होता. मॅराडोनाला अंगरक्षकाने हाताला धरून विश्रांतीकक्षात नेल्याची दृश्ये सोशिअल साईट्सवर आल्यावर त्याच्या प्रकृतीबाबत उलटसुलट अफवांना ऊत आला होता. त्यातूनच काही अतिउत्साही चाहत्यांनी मॅराडोनाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याच्या अफवा सोशिअल साईट्सवर टाकल्या आणि मॅराडोना प्रचंड संतापला.

मॅराडोनाला उपचारासाठी रुग्णालयात नेले असता हार्ट अटॅकने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती एका चाहत्याने आपल्या व्हाट्सअप व्हॉइस मेसेजने दिली.हा चाहता चक्क अर्जेन्टाईन भाषेत बोलत असल्याने फुटबॉल जगतात मोठी खळबळ उडाली. मॅराडोना आणि त्याच्या सहकाऱ्यांना जगभरातून फोनवर फोन आले. या सर्वाना आपण कुशल असल्याचे सांगताना मॅराडोनाची मोठी धावपळ उडाली. अखेर मी ठीक आहे .उलट पूर्वीपेक्षा फिट आहे असे स्पष्टीकरण मॅराडोनाला त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून करावे लागले.या मनस्तापाने मॅराडोना अतिशय संतापला असून त्याच्या मृत्यूच्या अफवा पसरविणाऱ्याला धडा शिकविण्याचा चंग त्याने बांधलाय.

अफवा पसरविणाऱ्याला पकडणारच

सुपरस्टार मॅराडोना जेव्हढा महान फुटबॉलपटू आहे तितकाच मोठा फुटबॉल चाहता आहे. अर्जेन्टिनाच्या रोमहर्षक विजयाने तो प्रचंड उत्तेजित झाला आणि त्याचा रक्तदाब वाढला .त्यामुळे त्याला भोवळ आली एवढेच .डॉक्टरांच्या उपचारानंतर तो पूर्ण बरा झालाय .चाहत्यांनी त्याच्या प्रकृतीची चिंता मुळीच करू नये. मात्र ज्या व्यक्तीने व्हाट्सअपवर अर्जेटिनी भाषेत व्हॉइस मेसेज टाकलाय त्याला शोधण्यासाठी आम्हाला मदत करावी. अफवेबाजाला पकडण्यास मदत करणाऱ्याला मॅराडोना ७ लाख रुपयांचे मोठे बक्षीस देणार आहे, असे निवेदन मॅराडोनाचा वकील मेटीएस मोर्ला याने काढले आहे. ५७ वर्षीय मॅराडोनानेही आपण धडधाकट असून खोट्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन आपल्या जगभरातील चाहत्यांना केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या