लियोनल मेस्सी आज मुंबईत, सुरक्षेसाठी मुंबई पोलिसांची जय्यत तयारी

अर्जेंटिनाचा सुपरस्टार फुटबॉलपटू लियोनल मेस्सी उद्या, रविवारी मुंबईत येत आहे. दक्षिण मुंबईतील सीसीआय येथे व वानखेडे स्टेडियमवर होणाऱया कार्यक्रमांना तो हजेरी लावणार आहे. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यावेळी कुठलीही गडबड किंवा गोंधळ होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

मेस्सीच्या कोलकात्यातील कार्यक्रमात ढिसाळ नियोजनामुळे व चाहत्यांच्या संतापामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला होता. उद्या मेस्सी क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबईत येतो आहे. मुंबई व आजूबाजुच्या शहरांमध्ये मेस्सीचे हजारो चाहते आहेत. त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी शक्यता आहे. त्या पार्श्वभुमीवर पोलिसांनी देखील तयारी केली आहे. पोलिसांची अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी तैनात राहणार आहे. वर्ल्डकपचा उपांत्य फेरीच्या सामना व हिंदुस्थानच्या वर्ल्डकप विजेत्या संघाच्या विजयी मिरवणुकीवेळी जसा बंदोबस्त होता, त्याच पद्धतीने बंदोबस्ताची तयारी पोलिसांनी केली आहे. फुटबॉलप्रेमींनी संयम राखावा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.