
>>राज चिंचणकर
महाभारतातल्या इतर व्यक्तिरेखा लक्षात घेता अश्वत्थामा तसा उपेक्षित राहिल्यासारखे जाणवते आणि हे अचूक हेरत थेट त्याला ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या प्रयोगाद्वारे रंगमंचावर दृगोच्चर करण्याचे काम नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते अशोक समेळ यांनी केले आहे.
मानवी जीवनाचे संपूर्ण सार ’महाभारत’ या महाकाव्याच्या खंडात दडले आहे, असे म्हटले जाते. महाभारतातल्या व्यक्तिरेखांनी स्वतचे अस्तित्व कायम करत आणि या महाकाव्याला उच्च स्तरावर नेऊन पोहोचवत त्यांची अमीट छाप या जीवनदर्शक काव्यावर उमटवली आहे. हजारो वर्षे उलटली तरी ‘महाभारत’ हा आजही अनेक जणांच्या अभ्यासाचा विषय आहे. जितके खोलात शिरावे, तितके अगाध ज्ञान या महाकाव्यातून हाती लागत राहते. आरंभापासून अंतापर्यंत मानवी जीवनाच्या पडछायेने संपूर्ण महाभारतावर ठसा उमटवल्याचे दिसून येते.
अनेकविध घटनांनी ठासून भरलेल्या या महाभारताचा अंतिम चरण मात्र अशा एका व्यक्तीच्या नावावर कोरला गेला आहे, जी व्यक्ती आजही जीवित असल्याचे सांगण्यात येते. ‘सप्तचिरंजीव’ ही संकल्पना रूढच आहे आणि त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे ‘अश्वत्थामा.’ त्याला चिरंजीवित्व लाभले असले तरी ते शापित आहे. श्रीकृष्णाने त्याच्या कपाळावरचा मणी काढून घेतल्यानंतर तिथे झालेल्या जखमेवर उतारा म्हणून तेल मागत अश्वत्थामा आजही पृथ्वीवर संचार करतो, अशी आख्यायिका आहे. महाभारतातल्या इतर व्यक्तिरेखा लक्षात घेता अश्वत्थामा तसा उपेक्षित राहिल्यासारखे जाणवते आणि हे अचूक हेरत थेट त्याला ‘मी अश्वत्थामा चिरंजीव’ या प्रयोगाद्वारे रंगमंचावर दृगोच्चर करण्याचे काम नाटककार, दिग्दर्शक व अभिनेते अशोक समेळ यांनी केले आहे.
अश्वत्थाम्यासारख्या इतिहासातल्या व्यक्तिरेखेला रंगभाषेच्या परिघात आणणे हे खचितच सोपे काम नाही, पण अशोक समेळ यांनी ते करून दाखवले आहे आणि यामागचे कारण खरे तर वेगळेच आहे. त्यांनी अश्वत्थाम्यावर महाकादंबरी लिहिण्याचा संकल्प सोडला आणि त्यासाठी त्यांनी केवळ महाभारताचीच नव्हे, तर या लेखनासाठी आवश्यक असणाऱया विविध गोष्टींची अक्षरश पारायणे केली. पण इतके करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी अश्वत्थाम्याचा प्रत्यक्ष शोध घेण्याचा अचाट उपामही राबवला. या परिश्रमातून निर्माण झालेल्या ’मी अश्वत्थामा चिरंजीव’ या प्रयोगातून त्यांनी अश्वत्थाम्याच्या चिरंजीव व्यथेची स’मेळ’ रंगभाषा आविष्कृत केली आहे.
सातपुडा पर्वतरांगांमधल्या अस्तंबा पर्वतावर अश्वत्थाम्याचे अस्तित्व असल्याचे सांगण्यात येते. याचा सुगावा लागताच अशोक समेळ यांनी संशोधनासाठी थेट अस्तंबा पर्वताकडे कूच केले. या सगळय़ा अभ्यासादरम्यान त्यांच्या अंतर्मनाने अश्वत्थाम्याला दृश्य स्वरूपात रंगमंचावर आणण्याची प्रेरणा दिली आणि त्यातून त्यांनी महाभारतातल्या अश्वत्थाम्याला थेट नाटय़ माध्यमातून मंचित केले. एकपात्री प्रयोगाद्वारे कायिक आणि वाचिक अभिनयाच्या माध्यमातून त्यांनी हा अश्वत्थामा साकारला आहे. त्यांचा अश्वत्थामा अक्षरश अनुभवण्यासारखा ठरतो. याचे कारण म्हणजे अशोक समेळ यांचे भारदस्त व्यक्तिमत्त्व आणि खणखणीत आवाज. खर्जातून उच्च स्वरापर्यंत लयीत फिरणारा त्यांचा आवाज अश्वत्थाम्याला सजीव रूप बहाल करतो. वक्तृत्वावरचे त्यांचे अद्भुत प्रभुत्व, सखोल संशोधनामुळे प्राप्त झालेला आत्मविश्वास आणि सादरीकरणाचे त्यांचे कौशल्य लाजवाब आहे. त्यांच्या साभिनयातून हा अश्वत्थामा अगदी समोर उभा ठाकल्याचा साक्षात्कार या प्रयोगातून होत राहतो.
रंगमंचावर हा अश्वत्थामा अचूक अवतरण्यामागे अशोक समेळ यांचे तब्बल दोन दशकांचे संशोधन आहे. लेखन, दिग्दर्शन व अभिनय अशी तिहेरी बाजू त्यांनी या प्रयोगासाठी लढवली आहे. कादंबरी लेखनातून आणि नंतर रंगमंचीय सादरीकरणातून अश्वत्थामा रंगवताना त्यांनी त्याच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे नीट पकडले आहेत. यासाठी त्यांनी महाभारताच्या साडेअठरा हजार पानांचे पारायण केले आहे. या आविष्कारातून अशोक समेळ यांच्या अंतरंगात दडलेला अश्वत्थामा आवश्यक त्या आवेशाने पेश होत जातो. अशोक समेळ यांनी या प्रयोगाच्या माध्यमातून अश्वत्थाम्याचे चिरंजीवित्व ठोसपणे मांडले असून जाता जाता त्याच्या जखमेवर फुंकर घालण्याचे कार्यही केले आहे.
– [email protected]





























































