
अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जात असल्या तरी सध्या या तीन गोष्टींमध्ये मोबाईलची भर पडली आहे. ही अतिशयोक्ती नाही. झोपडीपासून बंगल्यापर्यंत प्रत्येक जण शोधत असतो ते मोबाईलचे नेटवर्कच. मोबाईलमुळे जग जवळ आले असले तरी माणसे मात्र एकमेकांपासून दुरावली. त्यात सच्चाई असली तरी मोबाईल काही हातून सुटलेला नाही. अर्जित तालपत्रा यांनी त्यासाठीच कंबर कसली आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल येईल असा प्रयत्न केला. अर्जित यांना कोणी 35 कोटींचा मोबाईलवाला असेही म्हणतात.
खरे तर ही व्यावसायिक स्टोरी नव्हेच. ही आहे नव्या डिजिटल इंडियाची कहाणी. टु जी, फोर जी करत हिंदुस्थानचा मोबाईल ‘फाईव्ह जी’च्या काड्या शोधतो आहे. वीस हजार रुपयांचा किंवा त्यापेक्षा अधिक किमतीचा मोबाईल हातात बाळगणे हा कधीकाळी स्टेटस सिम्बॉल होता. आता मात्र ती एक गरज बनली आहे. हिंदुस्थानातील 35 कोटी जनतेकडे मोबाईलच नाही ही माहिती अर्जितने दिली तेव्हा धक्काच बसला. अर्जित यांचा फोकस त्याच 35 टक्के लोकांवर आहे. त्यासाठीच त्यांनी सहा वर्षांपूर्वी ‘आयटेल’ आणला होता.
तुमचा मोबाईल कुठल्या कंपनीचा आहे यावर तुमची कॉलर ताठ होत असते. अर्जित यांनी ती सारी गणिते खोटी ठरवली आहेत. बडय़ा बडय़ांना टक्कर देत अर्जित यांचा प्रवास सुरूच आहे. तब्बल 5 हजार जणांना रोजगार देऊन ‘हर हाथ में जादू’ म्हणणाऱया अर्जित यांनी ‘लाइफ सही है’ हा नवा सक्सेस मंत्र दिला आहे. पाच आकडी संख्येखाली दबलेल्या गरीब, मध्यमवर्गीयाला टार्गेट करून अर्जित यांनी चार आकडी वास्तव त्याच्या हाती दिले आहे. मोबाईल ही त्याची गरज पूर्ण केली आहे. स्मार्ट फोन ही आजची गरज असेल तर अर्जित तालपत्रा यांनी स्वस्तातील मस्त स्मार्टपणा दाखवला आहे, असंच म्हणूया.
























































