राजौरीतील लष्कराचा तळ हादरला, मेजरचा सहकाऱ्यांवर बेछूट गोळीबार; 6 गंभीर

जम्मू-कश्मीरमधील राजौरी येथील लष्कराच्या तळावर तैनात मेजरने आपल्याच सहकारी अधिकारी आणि जवानांवर बेछूट गोळीबार केल्याने तसेच हँड ग्रेनेड फेकल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत दोन अधिकारी व 4 जवान असे 6 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. दरम्यान, लष्करी तळावर तीन जवानांना ओलीस ठेवण्यात आल्याचेही वृत्त आहे. याबाबत लष्कराच्यावतीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

राजौरीतील थानामंडी या जंगलभागात दहशतवाद्यांच्या मुकाबला करण्यासाठी 48 राष्ट्रीय रायफल्सची तुकडी तैनात आहे. या तुकडीच्या मुख्य तळावर ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा संपूर्ण तपशील अद्याप हाती आलेला नाही.

मेजरने आपल्याच तुकडीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आणि जवानांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अनेक अधिकारी आणि जवान जखमी झाले आहेत. मेजर तेथीलच शस्त्र्ाागारांमध्ये लपून बसला असून तिथे त्याने तीन जवानांना ओलीस ठेवल्याचे कळते.

11 वर्षे सेवा झालेल्या या मेजर हुद्दय़ावरील अधिकाऱ्याने आपल्याच सहकाऱ्यांवर ग्रेनेडही फेकल्याचे वृत्त आहे. स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिथे तळ आहे ते गाव रिकामे करण्यात आले आहे.

हल्ल्यामागचे कारण अस्पष्ट

मेजरने हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. वरिष्ठ लष्करी अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.