अर्पण वर्ल्ड

प्रत्येकाने शिकायला हवे हे खरेच… पण शिकण्यासाठी पैसा लागतो. सरकारने बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत देण्याची सोय केलेली असली तरी तळागाळातल्या मुलांपर्यंत शिक्षण अजूनही पोहोचलेले नाही. याच मुलांची शिकण्याची तळमळ भागावी, त्यांना सहज आणि विनामूल्य शिक्षण घेता यावं यासाठी मुंबईतील ‘अर्पण एज्युकेशन’ या संस्थेने ‘अर्पण वर्ल्ड’ नावाचे एक ऍपच तयार केले आहे. हे ऍप पूर्णपणे विनामूल्य असून नुकतेच ते सुरू करण्यात आले. कोणत्याही मुलाला विनामूल्य शिक्षण घेता यावे हाच या ऍपमागील आपला प्रमुख उद्देश असल्याचे ‘अर्पण’ संस्थेचे सीईओ आणि संचालक राजन पटेल यांनी सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्यातील प्रामुख्याने इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीत शिक्षण घेण्यासाठी हे ऍप बनवण्यात आले आहे. यात इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्वच विषयांच्या संकल्पना विद्यार्थ्यांना नीट समजावून घेता येणार आहेत. कारण या ऍपमध्ये रंगीत प्रतिमा तर देण्यात आलेल्या आहेतच, पण त्यासोबतच डिजिटल मजकूर आणि महत्त्वपूर्ण माहिती तसेच परस्पर संवाद असलेले व्हिडीओही असल्यामुळे मुलांना प्रत्येक विषय समजावून घेण्यास खूपच फायदा होणार आहे.

या ऍपवरून शिक्षण घेतले तरी परीक्षेचे काय… हा प्रश्न उरतोच. त्यासाठीही आपल्या संस्थेने तरतूद केली आहे असे ते म्हणाले. एकदा विद्यार्थ्याने या ऍपद्वारे अभ्यास पूर्ण केला की त्याच्या अभ्यासाचे कौशल्य आणखी वाढवण्यासाठी त्याला नमुना ऑनलाइन चाचण्याही देता येणार आहेत. सध्या तरी आपले हे ऍप राजन पटेल यांनी महाराष्ट्रातच सुरू केले असले तरी हिंदुस्थानातील इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांनाही या ऍपचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले. सध्या हे ऍप विनामूल्य तसेच जाहिरातींविना सशुल्क अशा दोन्ही विकल्पांत उपलब्ध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या