विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलची बाटली फेकणारा गजाआड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर पेट्रोलची बाटली फेकणाऱयाला अखेर वाकोला पोलिसांनी अटक केली. गणेश रमाकांत पालेकर असे त्याचे नाव आहे. मोटरसायकलच्या टाकीत पाणी गेल्याने ते पाणी असलेले पेट्रोल गणेशने काढून ती बाटली विमानतळावर फेकली होती. गणेशला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची आहे. अकरा दिवसांपूर्वी गावदेवी झोपडपट्टीच्या शेजारील संरक्षक भिंतीवरून काही वस्तू विमानतळाच्या धावपट्टीवर आल्याचे सीआयएसएफच्या जवानांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तेथे पाहणी केली. तेथे बॉम्ब शोधक व नाशक पथकाला पेट्रोल असलेली बाटली आढळून आली. त्याची गंभीर दखल घेत सीआयएसएफने वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली. सीआयएसएफचे निरीक्षक मनीषकुमार सिंग यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाकोला पोलिसांनी गुन्हा नोंद केला.

परिमंडळ 8 चे पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांनी अधिकाऱयांना तपासाच्या सूचना दिल्या. सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शखाली वरिष्ठ निरीक्षक सुनयना नटे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक विक्रम पाटील, उपनिरीक्षक सुनील कडू, पाटील, मुदगल, दबडे यांच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी गावदेवी परिसर पिंजून काढला. पोलिसांनी काहींची चौकशी केली. चौकशी सुरू असतानाच पोलिसांना एक सीसीटीव्ही फुटेज दिसले. त्या फुटेजवरून तपासाची चक्रे फिरली. पोलिसांनी गणेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. कसून चौकशी केल्यावर त्याने ती बाटली फेकल्याचे पोलिसांना सांगितले. गणेशच्या मोटरसायकलच्या टाकीत पाणी गेले होते. पाणीमिश्रित पेट्रोल गणेशने बाटलीत काढले. त्यानंतर ती बाटली त्याने विमानतळ परिसरात फेकल्याचे चौकशीत समोर आले आहे. बाटली फेकण्यामागे त्याचा घातपाती हेतू नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले. गणेशला आज न्यायालयात हजर केले होते.