मालवणात सलग सहाव्या वर्षी घरोघरी अथर्वशीर्ष पठण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

श्री गणेशाच्या उत्सवास मोठया उत्साहात प्रारंभ झाला असून या उत्सवाचे औचित्य साधत मालवणच्या भंडारी ए. सो. हायस्कूलने सलग सहाव्या वर्षी मालवण शहर आणि परिसरात अथर्वशीर्ष पठणाचा उपक्रम राबविला आहे. शाळेतील पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे गट करत घरोघरी जाऊन अथर्वशीर्ष पठण करीत असल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेश चतुर्थी सणाचे औचित्य साधुन या प्रशालेने अथर्वपशीर्ष पठणाचा उपक्रम राबविला आहे. पाचवी ते आठवीपर्यंतचे सुमारे १५० विद्यार्थी, विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. मालवण शहर आणि परिसरातील घरांमध्ये जाऊन ही मुले अथर्वशीर्ष पठण करीत आहेत. अथर्वशीर्ष पठणाने घराघरातील चैतन्यदायी वातावरणात भर पडत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत असुन ही मुले खाजगी घरांबरोबरच सार्वजनिक गणेश मंडळानाही भेट देत अथर्वशीर्ष पठण करीत आहेत. या उपक्रमाचे सलग सहावे वर्ष असुन या उपक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका समिता मुणगेकर, संस्थेचे चेअरमन विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे.

प्रशालेतील आयबीटी विभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी गणेश चतुर्थीला लागणाऱ्या गणेश पुजा साहित्याची निर्मिती करून त्याची विक्रीही केली. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पुजा साहित्य विक्रीलाही गणेश भक्तांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.