
>> डॉ.आशुतोष कुलकर्णी
डॉक्टरांच्या परवानगीशिवाय सर्रास वेदनाशमन गोळ्या घेतल्यास शरीरावर त्याचे गंभीर आणि घातक दुष्परिणाम होऊ शकतात. जाणून घेऊया याबाबत.
दनाशमन करणारा डॉक्टर नेहमीच समाजात लोकप्रिय होतो. भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात वेदनाशमन करणारी वेगळी क्लिनिक लोकप्रिय होत चालली आहेत. सांधेदुखी, सतत होणारी डोकेदुखी, पाळीच्या वेळी होणारी पोटदुखी, लहान मुलांना सर्दी झाल्यामुळे होणारी कानदुखी यासारख्या रोजच्या व्यवहारात नियमित दिसून येणाऱया दुखण्यापासून कॅन्सरसारख्या रोगात होणाऱया वेदनांपर्यंत सर्वच वेदनांवरती आधुनिक उपचार पद्धती, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि इतर सर्व प्रकारच्या उपचार पद्धतीमध्ये उत्तम औषधे उपलब्ध आहेत.
आजच्या काळात आधुनिक उपचारपद्धतीत दिली जाणारी वेदनाशामक औषधे लोकप्रिय आहेत. जी लवकर वेदनाशमन करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या औषधांच्या दुकानात सर्रास उपलब्ध असतात. प्रमाणाबाहेर या गोळ्या सतत घेतल्यास शरीरावर त्याचे गंभीर आणि घातक दुष्परिणाम होऊ शकतात. म्हणून या लेखात वेदनाशामक औषधांविषयी लोकांना जागृत करण्यासाठी प्रयत्न करत आहे. वेदनाशामक गोळ्यांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत आणि त्यांचे शरीरावर होणारे मुख्य दुष्परिणाम अतिशय धोकादायक आहेत.
सूज, सांधेदुखी, दातदुखी आणि डोकेदुखी यासाठी काही काळापुरते वापरली जाणारी इबुप्रोफेन (Ibuprofen) किंवा डायक्लोफेनाक (Diclofenac) ही औषधे आहेत. या नॉन-स्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधांमुळे (NSAIDs) पोटातील अस्तरांना इजा पोहोचण्याची शक्यता असते. यामुळे पोटात जळजळ होणे, गॅस, अॅसिडिटी, मळमळ आणि काही वेळेस पोटात जखम होऊन रक्तस्राव होऊ शकतो.या वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर किडनीवर दुष्परिणाम करतात. दीर्घकाळ या गोळ्या घेतल्यास किडनी निकामी (Kidney Failure) होण्याचा मोठा धोका असतो.
पॅरासिटामोल (Paracetamol/Acetaminophen) ही सामान्यत सुरक्षित मानली जाणारी गोळी सुद्धा जर जास्त प्रमाणात घेतली तर लिव्हर निकामी करू शकते. काही वेदनाशामक औषधांमुळे रक्तदाब (High Blood Pressure) वाढू शकतो. तसेच हृदयविकाराचा झटका (Heart Attack) किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो.
ओपिओइड्स जसे की ट्रामडोल, कोडीन, मॉर्फीन या प्रकारच्या वेदनाशामक गोळ्यांची शरीराला सवय लागते. या गोळ्या अचानक बंद केल्यास नैराश्य, अस्वस्थता (Anxiety) आणि चिडचिड वाढू शकते.
शस्त्रक्रियेनंतर किंवा कॅन्सरसारख्या आजारात अत्यंत तीव्र वेदनाशामक गोळ्या नेहमी जेवणानंतर किंवा डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच घ्याव्यात, ज्यामुळे पोटाचा त्रास टळू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतच्या मनाने औषध घेऊ नका. मेडिकल स्टोअरमधून थेट आणून सतत गोळ्या खाणे टाळा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर वेदनाशामक औषध घ्यायची वेळ आलीच तर शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
सध्या संधिवातासाठी भोंदू वैद्य आयुर्वेदाच्या नावाखाली चूर्णामधून स्टेरॉईड आणि कुठलीही वेदनाशामक औषध देतात. त्याने लगेच बरे वाटते म्हणून वर्षानुवर्षे त्या पुडय़ा घेणारे काही रुग्ण आहेत. त्यातील रासायनिक औषधांचा दुष्परिणाम अतिशय भयानक आहेत. हाडे ठिसूळ होणे, चालता फिरता फ्रॅक्चर होणे, किडन्या खराब होणे. चेहरा सुजून हातपायच्या काडय़ा होणे, रक्त कमी होणे असे आजार कायमचे मागे लागतात, अशा भोंदू वैद्यांपासून सावधान.
घरी येऊन असाध्य व्याधींवर उपचार करतो म्हणून अशा भोंदू बाबांनी लाखो रुपये साध्याभोळ्या लोकांकडून लुटले आहेत. काही जण दिल्लीसारख्या दूरच्या ठिकाणी राहून असे पुडय़ा विकणारे भोंदू आहेत, जे अजूनही लुटमार करत आहेत आणि रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत. तेव्हा सर्वांनी काळजी घ्या. या सोशल मीडियाच्या नादी लागू नका.
आपल्या जवळचा डॉक्टर विश्वासू असेल, योग्य वैद्यकीय शिक्षण घेतलेला असेल तरच त्याच्याकडे उपचार घ्या. अशा ठावठिकाणा नसलेल्या भोंदू लोकांना दूर ठेवा. त्यांच्याकडून स्वत उपचार घेऊ नकाच, पण दुसऱयालासुद्धा त्याच्याकडे पाठवू नका.





























































