भविष्यातील युद्धे आणि सक्षम हवाई दल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन 

अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या अनेक विमानांचे (44 विमाने) नुकसान झाल्याच्या बातम्या समोर आल्या. स्वतःचे हवाई दल नसलेल्या इराणने अमेरिकेच्या हवाई दलाचे प्रचंड नुकसान केल्यामुळे जगभरात एक प्रश्न उपस्थित झाला की, आधुनिक युद्धामध्ये हवाई शक्तीचे महत्त्व कमी होत आहे का? काहींनी भविष्यात लढाऊ विमानांचे महत्त्व संपेल असे मत व्यक्त केले. हवाई शक्तीचे स्वरूप बदलले आहे. विमानांची जागा ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रे घेत आहेत.

सध्या युद्धे केवळ सीमांवर किंवा रणांगणावर लढली जात नाहीत, तर माहिती, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह, संप्रेषण व्यवस्था, मानवरहित विमाने, क्षेपणास्त्रे, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि सायबर हल्ले यांच्या साहाय्याने लढली जात आहेत. त्यामुळे आजच्या काळात हवाई शक्तीचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे.

इराण युद्धात झालेल्या अमेरिकेच्या विमानांच्या नुकसानीकडे पाहताना एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की, या हानीमध्ये केवळ लढाऊ विमानांचा समावेश नव्हता. त्यामध्ये मानवरहित विमाने, इंधन भरणारी विमाने, आकाशातून नियंत्रण ठेवणारी विमाने, हेलिकॉप्टर आणि इतर सहाय्यक साधनांचाही समावेश होता. काही हानी प्रत्यक्ष शत्रूच्या हल्ल्यांमुळे झाली, तर काही अपघात, तांत्रिक अडचणी किंवा स्वतःच्या दलाकडून झालेल्या चुकीच्या कारवाईमुळे झाली. त्यामुळे अमेरिकेची सर्व लढाऊ विमाने हवेतल्या संघर्षात नष्ट झाली नाही. या संघर्षाने हे दाखवून दिले की, आधुनिक युद्धामध्ये फक्त आघाडीची लढाऊ विमानेच महत्त्वाची नसतात, तर संपूर्ण युद्धव्यवस्था महत्त्वाची असते.

आज एखादे लढाऊ विमान हे स्वतंत्रपणे युद्ध जिंकू शकत नाही. त्या विमानाला उपग्रहांची मदत लागते, आकाशात इंधन भरणाऱया विमानांची मदत लागते, शत्रूची माहिती गोळा करणाऱया यंत्रणांची मदत लागते आणि इलेक्ट्रॉनिक संरक्षणाची आवश्यकता लागते. त्यामुळे आधुनिक युद्धात कोणत्याही देशाची खरी ताकद त्याच्या एकूण युद्धव्यवस्थेत असते. म्हणूनच आता युद्ध हे ‘एक विमान विरुद्ध दुसरे विमान’ इतके मर्यादित राहिलेले नाही.

इस्रायलने सांगितले की, त्यांच्या मानवचालित फायटर विमानांचे काहीच नुकसान झाले नाही. मात्र काही ड्रोन पाडले गेले. यामागे त्यांची दीर्घकालीन रणनीती आणि युद्धतयारी महत्त्वाची आहे.

इस्रायलने आपल्या मानवी वैमानिकांना कमीत कमी धोका निर्माण होईल अशी युद्धपद्धती स्वीकारली. त्यांनी शक्यतो शत्रूच्या अत्यंत धोकादायक क्षेत्रात प्रत्यक्ष प्रवेश टाळला आणि दूरवरून अचूक मारा करणाऱया शस्त्रांचा वापर केला. त्यांनी गुप्तचर माहिती, इलेक्ट्रॉनिक युद्ध आणि मानवरहित साधनांचा अत्यंत प्रभावी वापर केला. परिणामी, त्यांना फार कमी नुकसान सहन करावे लागले.

इस्रायलची सर्वात मोठी ताकद म्हणजे अचूक माहिती. कोणते लक्ष्य कुठे आहे, शत्रूची हवाई संरक्षण व्यवस्था कशी कार्य करते, कोणत्या वेळी हल्ला करावा आणि कोणत्या मार्गाने प्रवेश करावा याची त्यांच्याकडे अत्यंत बारकाईने माहिती असते. यामध्ये उपग्रह, गुप्तचर यंत्रणा, इलेक्ट्रॉनिक निरीक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे त्यांच्या हल्ल्यांमध्ये अचूकता असते आणि नुकसान कमी होते.

इलेक्ट्रॉनिक युद्ध

आधुनिक संघर्षात इलेक्ट्रॉनिक युद्धाची भूमिका प्रचंड वाढली आहे. पूर्वी युद्धामध्ये शत्रूचे विमान पाडणे हेच मोठे यश मानले जात असे. आता मात्र शत्रूची रडार व्यवस्था निकामी करणे, त्याचे संदेशवहन विस्कळीत करणे, त्याची दिशा चुकवणे किंवा त्याच्या क्षेपणास्त्रांना गोंधळात टाकणे हे तितकेच महत्त्वाचे झाले आहे. अनेक वेळा शत्रूचे विमान पाडण्यापेक्षा त्याला आंधळे करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे भविष्यातील युद्धामध्ये इलेक्ट्रॉनिक युद्ध निर्णायक ठरणार आहे.

मानवरहित विमानांचे महत्त्व

रशिया-युव्रेन युद्धाने आणि पश्चिम आशियातील संघर्षांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे मानवरहित विमानांचे वाढते महत्त्व. आज लहान आणि स्वस्त मानवरहित विमाने मोठय़ा व अत्यंत महागडय़ा लढाऊ विमानांना गंभीर आव्हान देत आहेत. या मानवरहित साधनांचा वापर निरीक्षण, लक्ष्य शोधणे, आत्मघाती हल्ले करणे आणि तोफखान्याला मार्गदर्शन करणे यासाठी मोठय़ा प्रमाणावर होत आहे. भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱया मानवरहित विमानांच्या तुकडय़ा युद्धाचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकतात.

याचा अर्थ लढाऊ विमाने महत्त्व आता एकटी निर्णायक ठरणार नाहीत. त्यांना उपग्रह, इलेक्ट्रॉनिक संरक्षण, मानवरहित साधने आणि अचूक क्षेपणास्त्रs यांची जोड आवश्यक असेल. म्हणजेच भविष्यातील हवाई शक्ती ही एका शस्त्रावर आधारित नसून अनेक साधनांच्या संयुक्त वापरावर आधारित असेल.

आज जगातील महासत्ता भविष्यातील युद्धासाठी वेगाने तयारी करत आहेत. चीनने कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ युद्ध, लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि मानवरहित तंत्रज्ञान यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांची रणनीती अशी आहे की, युद्ध सुरू होताच शत्रूची संपूर्ण व्यवस्था विस्कळीत करावी. शत्रूचे उपग्रह, संदेशवहन, रडार, विमानतळ आणि नियंत्रण यंत्रणा निकामी केल्यास त्याची युद्धक्षमता कोसळते. त्यामुळे भविष्यातील युद्धामध्ये ‘माहितीवर नियंत्रण’ हे सर्वात महत्त्वाचे शस्त्र ठरणार आहे.

भारतासाठी या संघर्षांमधून अनेक महत्त्वाचे धडे मिळतात. भारताने फक्त महागडी लढाऊ विमाने विकत घेण्यावर भर देऊन चालणार नाही. कारण भविष्यातील युद्धामध्ये फक्त काही मोजकी विमाने पुरेशी ठरणार नाहीत. युद्ध दीर्घकाळ चालल्यास मोठय़ा प्रमाणावर हानी होऊ शकते. त्यामुळे भारताने स्वस्त मानवरहित साधने, अचूक मारा करणारी क्षेपणास्त्रs आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध क्षमता यामध्ये मोठी गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

भारतासाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे चीनकडून होणारे तांत्रिक युद्ध. चीनकडे प्रचंड प्रमाणावर क्षेपणास्त्रs, मानवरहित विमाने आणि सायबर युद्धक्षमता आहे. भविष्यातील संघर्षामध्ये चीन भारताच्या विमानतळांवर, संदेशवहन यंत्रणांवर आणि रडार नेटवर्कवर मोठय़ा प्रमाणावर हल्ले करू शकतो. त्यामुळे भारताने आपल्या विमानतळांचे संरक्षण अधिक मजबूत करणे आवश्यक आहे. विमानांचे विखुरलेले तळ, भूमिगत संरक्षण आणि जलद दुरुस्ती क्षमता यावर भर द्यावा लागेल.

भारतीय हवाई संरक्षण व्यवस्थेलाही अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. आजच्या युद्धामध्ये शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रs आणि मानवरहित साधने रोखण्यासाठी बहुपर्यायी संरक्षण आवश्यक असते. त्यामुळे भारताने विविध प्रकारच्या हवाई संरक्षण प्रणालींचे एकत्रीकरण करून एक सशक्त राष्ट्रीय हवाई संरक्षण जाळे उभारले पाहिजे.

आजच्या काळात युद्ध म्हणजे केवळ गोळीबार नाही, ते माहितीचे युद्ध आहे, तंत्रज्ञानाचे युद्ध आहे आणि मानसिक सामर्थ्याचे युद्ध आहे. त्यामुळे भारताने भविष्यातील युद्धाची तयारी करताना पारंपरिक विचारसरणी बदलणे आवश्यक आहे. केवळ अधिक विमाने किंवा अधिक शस्त्रे विकत घेणे पुरेसे राहणार नाही. त्याऐवजी एकात्मिक, बुद्धिमान आणि तांत्रिकदृष्टय़ा सक्षम युद्धव्यवस्था उभारणे आवश्यक आहे.