शिक्षकांसाठी…

सामना प्रतिनिधी । मुंबई

शुक्रवारपासून शाळा सुरू होणार. उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टी… मुलांबरोबरच शिक्षिकाही शाळेत रुजू होणार. तुमच्या शाळेच्या पूर्वतयारीत आम्हीही थोडी मदत करतोय…
जून महिना उगवला की, शाळा सुरू होण्याचे वेध लागतात. उन्हाळय़ाची सुट्टी म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी असलेली पर्वणीच… हल्ली शिक्षण पद्धतीनुसार शाळा वेगवेगळ्या वेळी सुरू होतात… शाळेत जाण्यापूर्वीच दप्तर, पुस्तके, वह्या, पेन अशा शालोपयोगी वस्तूंच्या खरेदीला सुरुवात होते… मुलांच्या तयारीप्रमाणेच शिक्षिकाही या आरामदायी सुट्टीनंतर शाळेत रुजू होणार असतात. शाळेत जाण्याची ओढ मुलांप्रमाणेच त्यांनाही लागलेली असते… त्यामुळे त्यांनाही स्वतःची, त्यांच्या विषयांची पूर्वतयारी करणे इत्यादी गोष्टींचे नियोजन करावे लागते.

मोठय़ा सुट्टीमुळे एक वेगळा दिनक्रम ठरलेला असतो. त्यामध्ये शाळा सुरू झाल्याने आपसूकच बदल होतो. आठवडाभर किंवा महिनाभरासाठी परिधान करायच्या साड्या, ड्रेसेस, जेवणाचा डबा, मधल्या वेळेतलं खाणं, घरातली कामे, शिकवावा लागणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी कमीत कमी दोन आठवड्यांपूर्वीच करायला सुरुवात केली तर कामे सोपी होतात. यामुळे शिक्षिकांनाही आपल्या आवडीच्या कामांना वेळ देता येईल.

पौष्टिक नाश्ता
– सकाळी केलेल्या पौष्टिक नाश्त्यामुळे संपूर्ण दिवस उत्साही, ऊर्जावान राहण्यास मदत होते. याकरिता ताजी फळे, सुकामेवा, पौष्टिक लाडू तसेच रवा, पोहे, उपमा असा पोटभर नाश्ता करावा. थकवा कमी होण्यासाठी गोड पदार्थही स्वतःजवळ ठेवावेत.
– नेहमीच्या डब्यासोबत फळे, सलाड तसेच मधल्या वेळेत खाण्यासाठी पराठे, थेपले, सँडविच, चणे-शेंगदाणे, चुरमुरे, राजगिऱयाची, शेंगदाण्याची चिक्की, खाकरा असा सुका खाऊ ठेवू शकता.

पहिल्या दिवसाची तयारी
शाळेत नवीनच रुजू होणाऱ्या शिक्षकांनी शाळेची धोरणे, कार्यपद्धती समजून घ्यावी.
वर्गशिक्षक म्हणून ज्या वर्गात नेमणूक झाली असेल तिथे विद्यार्थ्यांकरिता सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत, त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांशी जवळीक वाढेल.
विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड, उपस्थिती, ग्रेड, शिस्त, नियम, सूचना यांची माहिती करून घ्यावी.
वर्गसजावट, स्वच्छता, सुविचार यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करावा. याबाबत वर्गातील मुलांशी बोलावे.
नवीन विद्यार्थी, सहकारी शिक्षक यांची ओळख करून घ्यावी.

मते जाणून घ्यावीत.
त्यांच्या मनात शिक्षक म्हणून तुमच्याविषयी असलेली भीती दूर होईल.

वस्तूंची खरेदी
– शाळेतील लेखी कामकाजासाठी लागणारी स्टेशनरी यामध्ये लाल, काळय़ा आणि निळय़ा रंगांचे पेन, एचबी पेन्सिल, वह्या, स्पायरल बाईंड वह्या, फुलस्केप पेपर्स, गणित शिकवत असाल तर कॅलक्युलेटर, ग्राफ पेपर, पेनड्राईव्ह अशा वस्तूंची यादी तयारी करून विकत घ्याव्यात. जेणेकरून ऐनवेळी त्या विसरल्या जाणार नाहीत.
– याशिवाय वैयक्तिक पावसाळी खरेदी यामध्ये छत्री, नवीन चपला, रेनसूट, शाळेत जाण्यासाठी लागणाऱया इतर वस्तू यांच्याही खरेदीचे नियोजन करावे.

वैयक्तिक तयारी
दररोज डब्यात न्यायची भाजी, इतर खाऊ, फळे, सलाड यांचे आठ दिवसांचे नियोजन केले तर ऐनवेळी कामाच्या व्यापात काही सुचले नाही असे होण्याची शक्यता टाळता येईल.

सुट्टीत भरपूर विश्रांती घेऊनच
शाळेत जाल, पण दररोज शाळा
आणि घर असा दिनक्रम सुरू झाला
तरीही झोप पूर्ण होईल असे पाहा.
जेणेकरून शिकवण्यावर आणि तब्येतीवर
अपुऱया झोपेचा वाईट परिणाम होणार नाही.
चेहरा तुकतुकीत उत्साही राहण्यासाठी टोनर, सनस्क्रीन लोशन, क्लिन्झिंग मिल्कचा वापर करावा.

शाळेत जाताना घ्यावी लागणारी पर्स, दररोज परिधान करायच्या साडय़ा किंवा ड्रेसची इस्त्री, नवीन साडय़ांची खरेदी, कॉटनच्या साडय़ांना स्टार्च, इस्त्री ही तयारी शाळा सुरू होण्यापूर्वी काही दिवस आधी करावी. जेणेकरून शाळेच्या दिवसांत घाईगडबड होणार नाही. अशा पद्धतीने आठ दिवसांच्या कपडय़ांचे नियोजन करता येईल.

घरातील छोट्य़ा छोट्य़ा कामांचे नियोजन करणे, पुस्तकांची कपाटे लावणे इत्यादी कामेही शाळा सुरू होण्यापूर्वी उरकून घ्यावीत. कारण नंतर यासाठी वेगळा वेळ काढणे शक्य होत नाही.

आपली प्रतिक्रिया द्या