आभाळमाया – हिरेमंडित ग्रह

>> वैश्विक,  [email protected]

हिरे  आणि सोन्याचं आकर्षण माणसाला इतिहासकाळापासून आहे. पृथ्वीवर अतिशय कमी प्रमाणावर सापडणाऱ्या या धातूंना ‘स्केअरसिटी व्हॅल्यू’ किंवा दुर्मिळता मूल्य असून त्यांची बाजारातली किंमत दिवसेंदिवस वाढताना आपण पाहतो. आपल्या देशात सुवर्ण किंवा सोन्याच्या दागिन्यांना फार महत्व आहे, पण पाश्चात्य जगात ज्याला ‘यलो मेटल’ म्हणतात त्या सोन्यापेक्षा हिऱ्यांचं महत्त्व अधिक. इंग्लंडचा राजा आजही त्याच्या मुकुटात हिंदुस्थानातून नेलेला कोहिनूर हिरा मिरवतो. हा फारसी शब्द असून ‘कोह’ म्हणजे पर्वत आणि ‘नूर’ म्हणजे प्रकाश किंवा तेज. या दोन शब्दांच्या संयुगातून हा शब्द तयार झालाय. याचं कारण असं की, हिरा असतोच तेजस्वी आणि चमकदार. त्याचं लोभस स्वरूप सर्वांनाच मोहित करणारं असतं.

पृथ्वीवर सुमारे 1 अब्ज 30 कोटी टन हिऱ्यांचा साठा असावा असा अंदाज आहे. त्यापैकी सर्वाधिक हिऱ्यांचं उत्पादन रशियात होतं. त्याखालोखाल आफ्रिकेतील कॉन्गो तसंच बोस्टवाना इत्यादी देशांमध्येही हिरे विपुल प्रमाणावर सापडतात. ऑस्ट्रेलियामध्ये रंगीत हिरे (पाचू, माणिक) जास्त आढळतात. यापैकी हिरा हा रासायनिकदृष्टय़ा कार्बनचं एक रूप आहे. म्हणजे कोळसा आणि हिरा दोन्ही शुद्ध कार्बनची खनिजं. मात्र वेगवेगळ्या तापमान आणि दाबामुळे त्यांच्या संरचनेत फरक दिसतो. हिरे तयार होतात ते मुख्यत्वे ग्रॅफाईटपासून. नैसर्गिकरीत्या त्यावर प्रचंड दाब आणि तुलनेने कमी पण अतिशय तापमान यांचा समतोल किंवा ‘इक्विलिब्रियम’ साधला की, हिऱ्यांचे कच्चे स्फटिकासारखे ‘क्रिस्टल’ बनतात. नंतर त्याला पैलू पाडून ते देखणे केले जातात.

या प्रक्रियेत हिऱ्याचं मूळ वजन खूप कमी होतं. त्याचे छोटे कणही दागिन्यांमध्ये उपयोगी पडतात. सर्व धातूंमध्ये अतिशय कठीण असलेला  हिरा हा धातू केवळ दागिन्यांमध्ये नव्हे तर अनेक यंत्रांमध्येही वापरला जातो. विशेषतः फिरती सूक्ष्म चक्र हिऱ्यात अडकवली तर ती सैल पडून डळमळत नाहीत. हिऱ्यांच्या खाणींचा जागतिक इतिहास सांगतो की, हे तेजस्वी स्फटिक हिंदुस्थानात सुमारे पाच हजार वर्षांपासून माहीत होते. त्याचे दागिने घडवले जात होते. एकेकाळी कृष्णा, गोदावरी नद्यांच्या परिसरात सापडणाऱ्या हिऱ्यांचं प्रमाण ओसरलं आणि सध्या मुख्यत्वे मध्य प्रदेशातील पन्ना येथील खाणीमध्ये हिरे मोठय़ा प्रमाणात मिळतात.

असं असलं तरी पृथ्वीला हिरेमंडित मात्र म्हणता येणार नाही. युरेनस, नेपच्यून या ग्रहांवर हिरेमिश्रित धुळीचा वर्षाव होतो. काही दूरस्थ ताऱ्यांच्या भोवतीच्या ग्रहांचा वेध घेतला तर हिरे सापडतीलही, परंतु आपल्या सौर संकुलातील सूर्याच्या सर्वात जवळच्या बुध ग्रहावर हिऱ्यांचा साठा विपुल प्रमाणात असल्याचं मानलं जातं.

असा केवळ समज नाही तर मेसेंजर आणि बेपीकोलंबो या बुध ग्रहाच्या जवळून वेध घेणाऱ्या दोन यांनांचे रिपोर्ट आता येऊ लागले आहेत. ‘मॅसेंजर’ने 2011 ते 2015 या काळात बुधाची पूर्वीच्या ‘मरिनर’ वगैरे यानांपेक्षा अधिक जवळून आणि अधिक शक्तीशाली निरीक्षण यंत्रणेसह परिक्रमा केली. या छोटय़ा ग्रहाची संरचना अवकाशातूनच जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण प्रचंड तापमानामुळे बुधावर एखादं यान उतरवणं फारच कठीण आहे.

बुधाचं विरळ वातावरण, मॅग्नेटिक फिल्ड भूसंरचनेचा सखोल अभ्यास ‘रिमोट’ अथवा दूरस्थ परिस्थितीनेच करण्यात आला. 2004 ते 2015 या काळात प्रचंड अंतराळ प्रवास करून मेसेंजरने बुधाचं रूप अधिक स्पष्ट केलं. बेपी कोलंबो ‘बुध, परिक्रामक’ किंवा मर्क्युरी ऑर्बिटर 20 ऑक्टोबर 2018 मध्ये अवकाशात गेले. 2025 मध्ये ते पृथ्वी, शुक्रासह बुधाचंही जास्त जवळून ‘दर्शन’ घेणार आहे ते त्याचं ‘कॉम्पोझिशन’ (संरचना) मोठय़ा प्रमाणावर जाणून घेण्यासाठी. हा दोन यानांचा संयुक्त प्रकल्प असून मर्क्युरी प्लॅनेटरी ऑर्बिटर आणि मर्क्युरी मॅग्नेस्टोस्फिअरिक ऑर्बिटर असे दोन भाग आहेत.

मेसेंजरच्या बुधविषयक निष्कर्षातून आता एक गोष्ट पुढे येतेय ती म्हणजे बुध ग्रहाच्या पृष्ठाखाली 18 किलोमीटरवर हिऱ्यांचा प्रचंड साठा आहे. कारण त्या ग्रहाचं तापमान किंवा दाब यामुळे त्याच्या पृष्ठावर पसरलेल्या ग्रॅफाइटचं विपुल प्रमाण. त्याचंच विशिष्ट दाब आणि तापमानात हिऱ्याच्या कणांमध्ये धुळीमध्ये किंवा कठीण ओबडधोबड हिऱ्यांमध्ये रुपांतर झाल्याची शक्यता आता संशोधकांना दिसतेय. या ग्रहावर जर जाताच येत नाही तर हे समजलं कसं तर ‘अॅनविल’ (ऐरण) यंत्राखाली प्रचंड दाब तापमानात बुधाच्या मॉडेलवरील ग्रॅफाईटचा अभ्यास केला तेव्हा या ‘सिम्युलेशन’मध्ये (म्हणजे बुधासारख्याच कृत्रिम स्थितीत) बुधपृष्ठाखाली हिरे भरपूर प्रमाणात असल्याचं संशोधकांना आढळलं. बेपी कोलंबो यान पुढील वर्षापासून यावर अधिक प्रकाश टाकू शकेल.

लोभी माणसाची नजर आता वेगळ्या कारणासाठी बुधाकडे जाऊ शकते. हिरेप्राप्तीसाठी उद्या कोणा उद्योजकाने बुध मिशन सुरू केलं तरी आश्चर्य वाटायला नको, परंतु नैसर्गिक तापमानाचं ‘कवच’ बुधाला लाभल्याने हे सोपं नाही. तिथे यान उतरवण्याचं असं स्वप्न पाहिलं तरी त्याने हिरे आणण्याचं काम सत्यात आणणं कठीण आहे आणि नुसत्या कार्बनरूपी हिऱ्यांचं काय करायचं? जगण्यासाठी आवश्यक ते सर्वात मौल्यवान पाणी तर आपल्या निळ्या ग्रहावरच मिळणार!