
- दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक
पंचांग म्हणजे काहीतरी जड, कठीण, अनाकलनीय असे उगाच वाटते. गुढी पाडव्याला पंचांगाचे महत्त्व मोठे असते. पाहूया पंचांग सोपे कसे असते ते!
पंचांग म्हणजे काळाचे आणि आकाशाचे वेळापत्रक! आज आपण या गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदू कालगणना असलेल्या पंचांगाची ओळख करूया. तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण या पाच अंगांची माहिती या पुस्तकात कोष्टकरूपाने दिलेली असते म्हणून याला ‘पंचांग’ म्हणतात. कालगणना आणि कालनिर्देश करणे हाच पंचांगांचा मूळ उद्देश असतो. पंचांगात, वर्षफल, उपनयन- विवाह- गृहप्रवेश इत्यादी मुहूर्त, वधुवर गुणमेलन कोष्टक, पावसाचा अंदाज, ग्रहणे, व्रते-सण-उत्सव यांचे दिवस, गावोगावच्या जत्रा-यात्रा, थोर पुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या, संकष्ट चतुर्थीचा चंद्रोदय, दररोजचे सूर्योदय-सूर्यास्त, ऋतूंचा प्रारंभ-समाप्ती काल , आकाशातील ग्रहांची स्थिती आणि धार्मिक कार्याचे मार्गदर्शन इत्यादी माहिती दिलेली असते.
l तिथी – पृथ्वीच्या केंद्रातून सूर्य आणि चंद्र यांच्यामधील अंशात्मक अंतराला ‘तिथी’ असे म्हणतात. सूर्य आणि चंद्र यांच्या भोगात 12 अंश अंतर झाले की एक तिथी होते. पंचांगात दररोजच्या तिथीचा अंक लिहून समाप्तीची वेळ लिहीलेली असते. तिथी म्हणजे चंद्राची आकाशातील स्थिती!
l वार – हिंदुस्थानी पंचांगातील वार हा सूर्योदयापासून लगतच्या सूर्योदयापर्यंत असतो.
l नक्षत्र – सूर्याच्या भासमान भ्रमणमार्गाला ‘क्रांतिवृत्त’ म्हणतात. क्रांतिवृत्ताचे 27 समान विभाग केले म्हणजे प्रत्येक भागाला ‘नक्षत्र’ म्हणतात.
l योग – क्रांतिवृत्तावरील आरंभस्थानापासून सूर्य-चंद्र जितक्या अंतरावर असतील, त्यांची बेरीज म्हणजे ‘योग’ होय. 13 अंश 20 कलांच्या बेरजेचा एक योग होतो. एकूण 27 योग आहेत.
l करण – अर्धी तिथी म्हणजे एक ‘करण’ होय. चंद्र-सूर्याच्या भोगांमध्ये सहा अंश अंतर झाले म्हणजे एक ‘करण’ होते.
पंचांगाचे गणित ज्या ग्रंथावरून तयार करतात त्याला ‘ करणग्रंथ ‘म्हणतात. फार प्राचीनकाली पंचांगाचे हे गणित’ सूर्यसिद्धांत’ या करणग्रंथावरून तयार केले जाई. त्यावेळी छपाईकला उदयास आली नव्हती, या ग्रंथाच्या हस्तलिखित प्रती तयार केल्या जात. काही पंडिताना तर हा ग्रंथ मुखोद्गत असे. या ग्रंथावरून गावोगावचे जोशी हस्तलिखित पंचांगे तयार करत. कालमानाप्रमाणे सूर्यसिद्धांत ग्रंथावरून केलेले गणित आणि प्रत्यक्ष आकाशातील ग्रहस्थिती यात फरक पडू लागला. सूर्यसिद्धांतावरून केलेले गणित चुकू लागले. सन 1520 मध्ये गणेश दैवज्ञ यांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी सूर्यसिद्धांत करणग्रंथामध्ये सुधारणा करून ‘ग्रहलाघव’ हा करणग्रंथ लिहीला. त्याचे गणित आकाशाशी जुळू लागले.
पंचांगाचे गणित प्रत्यक्ष आकाशाशी जुळणारे हवे असे छत्रपती श्री शिवाजी महाराजांनाही वाटत असे. त्यांनी कृष्ण पंडिताला संशोधन करून नवीन करणग्रंथ लिहीण्याचा आदेश दिला. त्यानुसार ग्रहगोलांचे प्रत्यक्ष वेध घेऊन, कृष्ण पंडिताने ‘करणकौस्तुभ’ हा करण ग्रंथ लिहीला. पूर्वी पंचांगे हस्तलिखित असत. पहिले छापील पंचांग 16 मार्च 1841 रोजी गणपत कृष्णाजी पाटील यांनी प्रसिद्ध केले. तेथपासून छापलेली पंचांगे प्रसिद्ध होऊ लागली. सन 1920 मध्ये पंचांगातील गणित आणि प्रत्यक्ष आकाश यात पुन्हा फरक पडू लागला. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या ही गोष्ट लक्षात आली. सन 1920 मध्ये आपल्या केसरी वृत्तपत्रात जाहिरात दिली. जो कोणी प्रत्यक्ष आकाश आणि पंचांग गणित यांचा मेळ राखणारा नवीन करणग्रंथ तयार करील तर मी त्याला एक हजार रूपये बक्षीस देईन. या आवाहनाला प्रतिसाद देऊन नागपूरचे डॉ. केशव लक्ष्मण दफ्तरी यांनी ‘करणकल्पलता’ हा करणग्रंथ तयार केला. श्री. व्यंकटेश बापूजी केतकर यांनीही ‘ ग्रहगणित ‘हा ग्रंथ लिहीला.
सध्या आम्ही पंचांगे संगणकाच्या सहाय्याने तयार करतो. ते अधिक सूक्ष्म झाले आहे. जसे आकाशात दिसते तेच पंचांगात दिलेले असते. किंवा जसे पंचांगात दिलेले असते तसेच आकाशात दिसते.
यावर्षीचे पंचांग
आपले पंचांग हे चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून फाल्गुन कृष्ण अमावास्येपर्यंत असते. यावेळी ते शनिवार, दि. 6 एप्रिल 2019 पासून मंगळवार, दि. 24 मार्च 2020 पर्यंत आहे. यावर्षी शालिवाहन शक संवत्सरामध्ये एकूण चार ग्रहणे होणार आहेत. 16 जुलै रोजी आषाढ पौर्णिमेच्या रात्री होणारे खंडग्रास चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे. 26 डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे. महाराष्ट्रातून आणि उत्तर हिंदुस्थानातून हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसेल. 10 जानेवारी 2020 रोजी होणारे छायाकल्प चंद्रग्रहण हिंदुस्थानातून दिसणार आहे.
या वर्षात 17 सप्टेंबर रोजी एकच अंगारकी संकष्ट चतुर्थी आहे. विशेष म्हणजे या वर्षींची पर्जन्य नक्षत्रे व त्यांची वाहने पाहता पाऊस मध्यम स्वरूपाचा व सरासरी एवढा पडेल.
पुढील दहा वर्षांतील गुढीपाडवा – l बुधवार, दि 25 मार्च 2020 l मंगळवार, दि. 13 एप्रिल 2021.
l शनिवार, दि. 2 एप्रिल 2022. l बुधवार, दि. 22 मार्च 2023. l मंगळवार, दि. 9 एप्रिल 2024.
l रविवार, दि. 30 मार्च 2025. l गुरुवार दि. 19 मार्च 2026. l बुधवार, दि. 7 एप्रिल 2027.
l सोमवार, दि. 27 मार्च 2028 आणि
l शुक्रवार, दि. 16 मार्च 2029.( अधिक चैत्र )































































