
>> गीता हरवंदे
हिंदुस्थानी वस्त्रपरंपरा जतन करण्याचा वसा घेतलेले रामुलू दुस्सा. हिंदुस्थानी हातमागाची रचनात्मक आणि सौंदर्यात्मक कल्पना आणि त्यातलं कौशल्य आजमावत रामुलू दुस्सा यांनी आपला प्रवास सुरू केला आणि वस्त्रोद्योगात स्वतःच्या नावाचं वलय निर्माण केलं.
नुकताच विणकर ज्ञाती समाजचा अखिल भारतीय साहित्य संमेलन वाशीमधल्या सिडको ऑडिटोरियम येथे पार पडला. तिथल्या नेत्रसुखद सजावटीमध्ये एक प्रमुख आकर्षण होतं ते म्हणजे हातमाग. जे विणकर समाजाची ओळख आहे. त्या हातमागाच्या वरच्या बाजूला शिवाजी महाराज, महात्मा गांधी, भगवान श्रीकृष्ण आणि तिरुपती बालाजी यांची चित्रं लावलेली होती. येणारा प्रत्येक साहित्यरसिक अर्थातच प्रथम हातमागाजवळ जाऊन आपला गतइतिहास डोळे भरून पाहू इच्छित होता. तिथले कार्यकर्ते प्रत्येकाला सांगत होते, ही सर्व चित्रे या हातमागावर विणलेली आहेत. हा हातमाग आजही चालू आहे आणि ते चालविणारे हे कारागीर ‘रामुलू दुस्सा’ आहेत. कार्यकर्त्यांचं बोलणं ऐकून आणि ते दृश्य पाहून प्रत्येकाचेच डोळे विस्फारत होते.
विणकर म्हणजेच साळी. यांच्या जवळपास पंधरा पोटजाती आहेत. विणण्याची कला नेमकी केव्हा सुरू झाली याचं संशोधकांमध्ये जरी एकमत नसलं तरी ऋग्वेदातील दहाव्या मंडलातील 53 व्या सूक्तातला सहाव्या श्लोकात या कलेचा उल्लेख आला आहे. ‘हे मानवा तू सूत कात, त्याला रंगव आणि सुरेख कापड तयार कर. त्याप्रमाणे आडवण- उभारणी विणत ज्ञान, कर्म आणि उपासनेच्या मार्गावर नित्य राहा,’ असा त्या श्लोकाचा अर्थ आहे. यावरून वस्त्र विणण्याची कला वेदपूर्व काळापासून अस्तित्वात आहे. मोहेंजोदरो आणि हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या शिलालेखावरून विणण्याची कला इ.स.पूर्व 5000 वर्षांपासून अस्तित्वात होती. विणकर समाजाचे दोन पुराण ग्रंथ आहेत. एखाद्या ज्ञातीची असे पुरातन ग्रंथ असलेला समाज हिंदुस्थानात क्वचितच असावा.
ब्रिटिश हिंदुस्थानात आले. त्यांनी आपल्याबरोबर अनेक गोष्टी आणल्या आणि हिंदुस्थानातल्या उपलब्धतेतून अनेक गोष्टी नव्याने सुरू केल्या. पॉवरलूम आले आणि साळय़ांच्या घरातल्या हातमागांचा सटक-फटक आवाज क्षीण होऊन हळूहळू पूर्ण बंद झाला. कोकणातील तर सारे विणकर मुंबईत गिरणी कामगार झाले, पण दक्षिण हिंदुस्थानात आजही ही कला आणि विणकर तग धरून आहेत. रामुलू साळी हे असेच एक कलाकार ज्यांनी विणकाम ही कला घडवली.
रामुलू हे हैदराबादचे पद्मसाळी असल्याने घरात हातमाग होताच. वयाच्या तेराव्या वर्षापासून ते हातमाग चालवत होते. चार भाऊ आणि चार बहिणी अशा आठ भावंडांचा त्यांचा परिवार. मोठे दोन भाऊ मुंबईत गिरणीत कामाला होते. आपलंही नशीब अजमावण्यासाठी रामुलू 1961 मध्ये मुंबईत आले. प्रथम ते रणजीत स्टुडिओत पेंटर म्हणून कामाला लागले. नंतर कमला मिलमध्ये कामाला लागले. त्यावेळी महिना 25 ते 30 रुपये मिळत, पण त्यांचं मन काही रमत नव्हतं. पुढे जानेवारी 1962 मध्ये प्रभादेवीच्या स्टॅण्डर्ड मिलमध्ये लागले ते अगदी 1998 मध्ये निवृत्ती घेईपर्यंत आणि इथेच त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
मफतलालच्या स्टॅण्डर्ड मिलमध्ये रामुलू साच्यावर काम करू लागले. जवळपास सहाएक वर्षे ते साचा चालवत होते. एक दिवस एका खोलीत हातमाग ठेवलेला रामुलूंच्या दृष्टीस पडला. साक्षात आपल्या दैवताचं दर्शन घडावं असा आनंद रामुलूंना झाला. रामुलू त्या खोलीत गेले आणि त्या हातमागावरून कृतज्ञतेने हात फिरवू लागले. कंपनीने तो हातमाग बनारसवरून आणून एक मॉडेल म्हणून नुसता ठेवलेला होता. योगायोगाने खात्याचा मॅनेजर तिथे आला. रामुलूचे ते भावविभोर डोळे पाहून मॅनेजर त्यांना म्हणाला, ‘आप को आता है यह चलाने?’ त्यावर रामुलू म्हणाला, ‘साहब, मैं तो जातकाही बुनकर हूं। हमारे हर घर में हातमाग है। इसके साथ साथही हम बडे होते हैं।’
‘तो फिर आजसे आप पॉवरलूम छोडके यह हाथमाग चलाओ’, मॅनेजरने रामुलूला सांगितलं. रामुलूने हातमागावर प्रथम शर्टपीसचा नमुना काढून दाखवला. तो ‘सँपल पीस’ पाहून मॅनेजर मनात समजून चुकला की हा एक कलाकार आहे. आतापर्यंत आर्टिस्ट कागदावर कपडय़ाच्या डिझाइन्स काढत होते. रामुलूच्या रूपाने प्रतिमेपेक्षा प्रत्यक्ष कापडच हाती आलं. या नमुना कापडावरून व्यापारी हजारो मीटरची ऑर्डर देऊ लागले. रामुलूच्या विभागात आणखी आठ हातमाग आले. मफतलालच्या इतर ठिकाणच्या सर्व मिलमधील नमुना कापडाचं काम प्रभादेवीच्या स्टॅण्डर्ड मिलमधून चालत होतं.
पुढे 1984 मध्ये थाय-पंजाब या थायलंडमधील कंपनीचे प्रॉडक्शन मॅनेजर स्टॅण्डर्ड मिलमध्ये आले असता त्यांना रामुलूंच्या विभागातील काम पाहिलं. त्यांनी स्टॅण्डर्ड मिलच्या मॅनेजरला रामुलूकरवी थायपंजाबमध्ये असं डिपार्टमेंट करण्याची विनंती केली. रामुलू एक महिन्याची रजा घेऊन थायलंडला रवाना झाले. एका महिन्यात त्यांनी थाय-पंजाब कंपनीत नमुना कापडाच्या विभागाचं बस्तान बसवून दिलं.
पुढे 1988 साली स्टॅण्डर्ड मिलचे मॅनेजर भास्करन स्टॅण्डर्ड मिलची नोकरी सोडून मॉरिशसला गेले. तिथे चालवायला घेतलेल्या टेक्स्टाइल मिलमधील नमुना विभाग रामुलू यांनीच थाटला. याचप्रमाणे रामुलूला दक्षिण आफ्रिकेला बोलावलं गेलं. तिथेही रामुलूने नमुना विभागाचा श्रीगणेशा करून आले. मफतलाल ग्रुपच्या नऊही मिलमध्ये रामुलूने नमुना विभागाचं बस्तान बसवलं. त्यासाठी अहमदाबाद, सुरत, नडियाद अशा ठिकाणी ते गेले. लालबागच्या मोरारजी गिरणीपासून ते मुंबईतील इतर गिरण्यांतूनसुद्धा त्यांनी नमुना विभागाची उभारणी केली. इतर लहान कंपन्यांसाठीसुद्धा त्यांनी काम केलं. कोल्हापूर-सोलापूरपासून ते कोईमतूरपर्यंत निवृत्तीनंतरही ते काम करीत राहिले.
नमुना विभागाची उभारणी करताना रामुलू स्वतः हातमाग बनवून घेत व ते त्याला गिरण्यांतून त्याची स्वतः जोडणी करीत हे त्यांचं वैशिष्टय़ होतं. अगदी परदेशातसुद्धा त्यांनी स्वतः बनवून घेतलेले हातमाग नेले. सध्या राहत असलेल्या अंगणात त्यांनी शंभर हातमाग बनवले आहेत. आज त्यांचं वय 80 वर्षे पूर्ण आहे. बाहेर कुठेही जाण्यास कुटुंबीयांनी मनाई केली असली तरी रामुलू या घराच्या मागावर देवादिकांची आणि व्यक्तींची पेंटिंग विणत असतात. कारण तोच त्यांच्या जगण्यातील आनंद आहे. विचारही खूप प्रगल्भ आहेत. पेंटिंग करताना ते भान हरपून जातात. चार-पाच तास मान मोडून ते काम करावं लागतं. दिवसभर इतकं एकाग्रतेने काम करून एक पेंटिंग तयार होण्यास कमीत कमी दोन महिने लागतात.
जाता जाता रामुलूंनी त्यांच्या मनातल्या शेवटच्या दोन इच्छा बोलून दाखवल्या. म्हणाले, ‘सर्वांसाठी मला एक हातमाग बनवायचा आहे. हातमाग चालवण्याने सर्वांगाला व्यायाम होतो. अर्धांगवायूची भीती नाही. शिवाय स्वतः विणलेल्या कापडाचा आनंद काय बरं वर्णावा…’ आणि दुसरी महत्त्वाची इच्छा आहे ती म्हणजे शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आणि वाघाचं पेंटिंग बनवून स्वतः उद्धवजींना बहाल करायचं आहे. मला त्यांच्या या इच्छेतील तीव्रता जाणवली. मी म्हटलं, ‘तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नसेल अशा संधी तुमच्या आयुष्यात चालून आल्या तर कदाचित हीसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होईल.’
सध्या ते वर्षातून एकदा त्यांचं जे दैवत मार्कंडेश्वराच्या उत्सवासाठी तीन शॉल्स बनवतात. हा त्यांच्या तेलगू ज्ञाती बांधवांचा मोठा उत्सव असतो. त्यासाठी तिथल्या देवस्थानात त्यांनी हातमाग ठेवला आहे. तेथेच बसून ते तीन शॉल्स बनवून आपल्या दैवताला अर्पण करतात. हे त्यांचं व्रत आहे. 80 वर्षांनंतरही व्रत करणाऱ्या, आपल्या कर्तृत्वावर दृढ विश्वास असणाऱया रामुलूंसारख्या तपस्व्याची इच्छा अपूर्ण कशी राहील बरे!































































