13 दिवस- 33 किल्ले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> संजीवनी धुरी-जाधव

ऐतिहासिक वारशाची प्रचंड आवड असलेल्या दोन दुर्गप्रेमींनी नुकतेच 13 दिवसांत 33 किल्ले सर करण्याचा अनोखा पराक्रम केला आहे. त्यांच्या या शौर्याचे सगळय़ाच स्तरांतून कौतुक होत आहे. विशाल देवकर आणि अभिषेक सावरकर अशी या दुर्गप्रेमींची नावे आहेत.

गडकिल्ल्यांच्या प्रेमातून अंगी असलेल्या उपजत कलेतून मी गेली अनेक वर्षे महाराजांच्या विविध उत्सवांमध्ये किल्ल्यांची प्रतिकृती तयार करून जनसामान्यांच्या मनात गडकिल्ल्यांच्याप्रति आत्मियता निर्माण करण्याचे छोटेखानी कार्य करत असतो. या कार्यातूनच गडकिल्ल्यांची ओढ स्वस्थ बसू देत नक्हती. केकळ पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही त्या सोबतच प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन इतिहास व भुगोल समजून घेणे गरजेचे वाटंत असे म्हणूनच गेली अनेक वर्ष सह्याद्रीत भटकंती करत होतो. नुसतीच भटकंती नव्हे तर शिवराय व दुर्ग ही संकल्पना किती व्यापक आहे याचे धडे गिरवत होतो. या दरम्यान एक गोष्ट प्रकर्षाने माझ्या लक्षात आली ती म्हणजे या गडकिल्ल्यांचे आजचे खरे किल्लेदार कोण असतील तर ते म्हणजे किल्ल्याच्या परिसरातील स्थानिक होय. कारण अन्य लोकांपेक्षा तिथल्या स्थानिकांचा त्या किल्ल्यांवर चांगला वचक असतो. दुर्दैवाने आपण त्यांना त्या किल्ल्याचे महत्त्व पटवून द्यायला कुठेतरी कमी पडतोय. त्यासाठी आधी आपण किल्ले भ्रमंती करणं आणि तिथली परिस्थिती समजून घेणे जास्त महत्त्वाचे आहे असा विचार केला आणि आम्ही दोघांनीही मोटरसायकलवरून किल्ले सर करण्याचा निर्धार केल्याचे विशाल सांगतो.

खरंतर घरातून यासाठी परवानगी मिळणे थोडे जडच गेले. कारण आम्ही दोघंच जाणार होतो. मोटरसायकलने एवढा लांबचा प्रवास करणार होतो, नेमके कुठे राहणार, काय खाणार इथून सुरुवात होती. त्यामुळे घरच्यांना थोडी काळजी होतीच पण आमचा निर्धार पाहून शेवटी त्यांनी होकार दिला. मात्र, घरी सुखरूप परत येइपर्यंत घरच्यांच्या काळजीच होती. उत्तम नियोजन, वेळेचा कटाक्ष, शिस्त या त्रिसूत्री समीकरणांच्या जोरावर आम्ही ही मोहीम सहज यशस्वी करू शकलो.आम्ही किल्ले सर करणार हे आधीपासूनच ठरवले होते आणि तसे नियोजनही केले होते. त्यासाठी आम्ही उन्हाळा निवडला. सगळ्यात आधी ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणची संपूर्ण माहिती घेतली. सकाळी उठल्यावर चहा बिस्कीट, दुपारी सुकामेवा आणि रात्री जेवण असे आमचे नियोजन होते. दुपारचे जेवण न करता आम्ही दुपारी अधिकाधिक सुकामेवा खायचो.

दुर्गभ्रमंती करत असताना विशालला त्याचा अनुभव विचारला असता तो सांगतो, उत्तम नियोजन, आणि परिपूर्ण माहितीच्या जोरावर आम्हाला कमी खर्चात जास्तीत जास्त किल्ल्यांपर्यंत पोहोचता आले. किल्ल्याला भेट द्यायला गेलो त्यावेळी तिथल्या स्थानिकांची बरीच मदत मिळाली. तिथली मंदिरं, आश्रम, मठ या ठिकाणी रात्रीचा निवारा घ्यायचो. पुढे तो सांगतो, माझे गुरु दुर्गमहर्षी प्रमोद मांडे त्यांनी सांगितलेले वाक्य आजही माझ्या लक्षात आहेत, कुठल्याही ठिकाणी जाताना त्या परिसरातील आजुबाजुची मंदिरे, आश्रम, मठ याची माहिती घ्यायला हवी आणि आम्ही तेच केलं. या सगळ्याबरोबर एक गोष्ट त्यांची कायम ध्यानात ठेवली ती म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असतांना आपली जिद्द असली पाहिजे तशीच हद्दही असली पाहिजे. त्यामुळे आम्ही ती हद्द जाणली आणि शारीरिक क्षमतेचा अनुमान घेत मोहिमेस विराम देत तेरा दिवसात परत आल्याचे विशाल सांगतो. जिजाऊंचे जन्मस्थळ असलेले सिंदखेड राजा येथून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. साधारण 3600किमीचा आम्ही प्रवास केला. त्यामध्ये देवगिरी, अंतूर, भांगशी, गाळना साल्हेर, मुल्हेर, ब्रह्मगिरी, हरगड, रामसेज रायगड इत्यादी असे तेहत्तीस किल्ले सर केले. दिवसाला किमान दोन किल्ले व्हायला हवेत असे ध्येयच ठेवल्याचे किशालने सांगितले.

फक्त भ्रमंती नाही..
किल्ल्यांना केवळ धावतपळत भेट देणे हा आमचा उद्देश नव्हताच. आम्ही प्रत्येक किल्ल्याचे अभ्यासपूर्ण निरीक्षण केले. त्या किल्ल्याला दरवाजे किती, मंदिर, मूर्ती किती, किल्ल्यातल्या काही गोष्टी याची नोंद केली आणि त्याची छायाचित्रे काढून घेतली. तसेच तिथल्या स्थानिक लोकांकडून प्राथमिक माहिती मिळकली. भविष्यात या गोष्टींची नोंद आपल्याकडे अमूल्य ठेवाच राहिल.

इतिहासावरच भविष्याचा डोलारा
विविध किल्ले फिरल्यानंतर तिथल्या परिसरातील स्थानिक लोकं आहेत. त्यांना त्या किल्ल्यांविषयी जनजागृती करणे गरजेचे आहे. किल्ल्यांचे महत्त्व काय आहे, त्यांची काळजी कशी घ्यायला हकी याची माहिती तिथल्या स्थानिकांना देणे गरजेचे आहे. यातून भविष्यात त्यांना रोजगाराची संधीही या गडकिल्ल्यांच्या मार्फत मिळू शकते. सुट्टीत एक भेट एखाद्या किल्ल्याला द्या. इतिहासाची माहिती करून घ्या. कारण आपल्या इतिहासावरच भविष्याचा डोलारा असल्याचे त्याने तरुणांना आवाहनच केले आहे..