जेवढे शक्य होते तेवढे करत गेलो!

>> डॉ. गिरीश ओक (ज्येष्ठ अभिनेते)

मदतीला कोणतेही परिमाण नसावे. माझी मदत घरापासून सुरू झाली. बारीकसारीक गोष्टींतून मदतीच्या संधी मिळत गेल्या.

लॉकडाऊनच्या काळात अनेकांना मदतीची गरज होती. अनेकांच्या या काळात नोकऱया गेल्या, पगार कपात करण्यात आले. त्यामुळे अनेकांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यात आम्हीही चुकलो नाही. आमचेही पूर्णपणे काम बंदच होते. पण आमच्याकडे ज्या काम करायला ताई येतात, मुलीला शाळेत सोडायला व्हॅन असते त्यांचे पगार आम्ही थांबवले नाहीत. त्यांना पूर्ण पगार दिला. जी प्राथमिक मदत असते त्याची सुरुवात घरात काम करणाऱया माणसांपासून केली. शिवाय आम्हाला जे काही नाटय़ परिषद अन्य कुठून ऍडिशनल पॅकेज मिळत होते ते आम्ही न वापरता ज्यांना त्याची खरी गरज आहे त्यांना ते देत होतो. बाकी आम्ही शक्य तेवढी मदत करत होतो. सोसायटीचा वॉचमन म्हणा त्यांनाही मदत करत होतो. जे काही जमेल ते माझ्या परीने करण्याचा प्रयत्न करत होतो. फार मोठी कोणाला मदत केलेली नाही. पण ज्यांना अजिबातच काही मिळत नाही त्यांना आम्ही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावरही बऱयाच पोस्ट येत होत्या या गरजूंचे पगार थांबवू नका. त्या गोष्टी आम्ही चालू ठेवल्या होत्या त्याचे आम्हाला समाधान आहे. काहीवेळेला दुसऱयाला केलेल्या लहानशा मदतीतूनही आपल्याला सुख मिळत असतं. याचा प्रत्यय या काळात आला.

नाटय़ परिषदेतर्फे पडद्यामागचे जे कलाकार आहेत त्यांच्यासाठी निधी गोळा केला होता त्यातही माझ्यातर्फे जी काही नाटय़ परिषदेला मदत अपेक्षित होती ती मी केलेली आहे. एकत्र स्वरूपात त्याची वाटणीही झाली. ते पूर्णपणे आमच्यावर अवलंबून असतात. इतकी वर्षे आपण त्यांच्यावर अवलंबून असतो, आपला थोडय़ा काळासाठी संपर्क तुटला आहे म्हणून आपण त्यांना काही द्यायचे नाही किंवा आता ते काम करत नाहीत मग पगार देण्याची गरज नाही असा विचार आम्ही केला नाही आणि तुम्हीही करू नये. आपल्या आणि त्यांच्या गोष्टींमध्ये खूप तफावत असते. खूप प्राथमिक गोष्टींची त्यांच्याकडे कमतरता असते. त्यानुसार त्यांना मदत केली. माझ्या मते मदत केल्यावर या हाताचे त्या हाताला कळू नये असे वाटते. त्याने मिळणारं समाधान जास्त आनंद देतं. ज्या काही गोष्टी कळल्या तिथे मदत करत गेलो. शक्य तेवढी मदत केली. खरं तर या सगळ्यात मालिका सगळ्यात आधी सुरू झाल्या. त्यामुळे ज्यांच्या मालिका चालू होत्या त्यांचे जगणं सुरळीत झालं. त्यांची गाडी रूळावर आली. पण जे पूर्णपणे रंगमंचावर आधारित कलाकार होते. ऑर्केस्ट्रा असतील, जादूगार असतील, छोटय़ा छोटय़ा भूमिका करणारे असतील. पूर्णपणे रंगमंचावर काम करणारी लोकं आहेत त्यांना खूपच त्रास झाला आणि अजूनही आहेच. तसेच तमाशा कलावंत आहेत, लहान डान्सर आहेत त्यांच्यापैकी कोणाचे फोन यायचे. त्यांना मदतीची अत्यंत गरज असायची. मग त्यांना नाटय़ परिषद किंवा अन्य सेवाभावी संस्था असतील त्यांचे नंबर देऊन त्यांच्यामार्फत काही मदत होतेय का ते केले. अजूनही त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. शक्य तेवढी आम्ही मदत करतो ज्यांना शक्य आहे त्यांनीही करावी असे मला वाटते. हा प्रश्न सुटणारा नाही. यावर जेव्हा उपाय येईल त्यावेळी यातून सुटका होईल. त्यावर जेव्हा उपाय येईल तोपर्यंत यातून सुटणं शक्य वाटत नाही. आपण म्हणतो एकीकडे की व्यवसाय फारवेळ थांबवता येत नाही. कुठेतरी त्यातून बाहेर पडायला हवे. त्यासाठी हात धुणे, मास्क घालणे, अंतर राखणे हे तीन नियम पाळायला हवेत, पण ते करूनही काही गोष्टी अजून सुटलेल्या नाहीत. त्यात लग्न सुटली, अंत्ययात्रा, छोटय़ा सभा सुटल्या, ओपन एअर थिएटर सुटली, पण हा सगळा त्यावर उपाय नाही. यावर तोडगा कधी निघेल, त्यांची कोंडी केव्हा सुटेल ते काही सांगता येत नाही. हा फार अडचणीचा प्रश्न आहे.

या काळात अनेक वाईट बातम्या कानावर पडल्या. जेव्हा ते जवळच्या लोकांसोबत झाले तेव्हा त्याचा जास्त त्रास झाला. कुटुंबातील सर्वात मोठय़ा व्यक्तीचे निधन झाले, एकमेकांना सांगता येत नाही असे एक ना अनेक प्रसंग या काळात जाणवले प्रत्येकवेळी स्वतःला समजवत होतो. जी धाकधुक डॉक्टर, पोलीस यांना घरी जाताना असते तीच आता मला असते. रोज घरी जायचे आणि आपलीच बायको, आपलीच मुलगी यांना धोक्यात आणायचे. त्यामुळे आम्ही नेहमी असेच समजायचो की एक दिवस पुढे सरकला आहे. सुदैवाने अजून तरी तशी काही अडचण आलेली नाही. पण मी माझी काळजी योग्य पद्धतीने घेतो.

आपली प्रतिक्रिया द्या