
>> आकाश दीपक महालपुरे
विज्ञानाच्या भरारीने सारे जग आज आपल्या ‘मुठ्ठी मे’ खरे आहे, पण बाहेरचे जग आत घेताना एक आतलेही जग असते हे विसरून कसे चालेल. विज्ञान कसे काबूत ठेवायचे याचे एक अंतर्विज्ञान असते. आज ते न जाणून घेता आपण फक्त मनोरंजनाचे एक साधन म्हणूनच या माध्यमांकडे पाहत आहोत, पण दुसऱयाचे खेळ, गाणी, नृत्य, विनोद पाहताना आपला स्वतःच्या जडणघडणीचा वेळ किती वाया जातो याचे भान ज्या युवकाला आहे तोच युवक पुढच्या कालप्रवाहात तग धरून असेल. मग मोबाईल, कॉम्प्युटर, यूटय़ूब, फेसबुक यांत किती गुंतायचे हे आपणच साक्षेपाने म्हणजेच सारासार विचाराने ठरवायचे असते. कारण तारुण्याचा काळ म्हणजे भविष्याची तयारी वर्तमानात करण्याचा काळ असतो. जो या वर्तमानात गाफील राहिला त्याला मुळीच भविष्य नसते.
अर्थात, आनंदाची विशेष बाब म्हणजे सातारा जिल्ह्यातील चचेगावच्या (ता. कराड) ग्रामस्थांनी अशा परिस्थितीवर चर्चा करीत राहण्यापेक्षा त्यावर नामी उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला. यंदाच्या जागतिक पर्यावरणदिनी ग्रामसभा झाली. त्यात गावातील निवृत्त शिक्षक टी. के. पवार यांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गावातील घराघरांतील टीव्ही, मोबाईल सायंकाळी दीड तास बंद ठेवावेत असा मुद्दा उपस्थित केला. सर्वानुमते त्यास मंजुरी देऊन ठराव तयार करण्यात आला. मग मुलांच्या अभ्यासाची वेळ राखीव ठेवण्यात येऊन ती सर्वांना कळावी यासाठी गावच्या मंदिरावर भोंगा बसविण्यात आला. तो वाजताच सायंकाळी घराघरांतील टीव्ही संच, मोबाईल बंद ठेवण्यात गाव यशस्वी झाले. त्याचा मुलांना अभ्यासासाठी चांगला फायदा होत आहे, असे गावकरी सर्वत्र सांगत आहेत. खरे तर सर्व गावांसाठी हे उदाहरण प्रेरणादायी ठरत आcहे. अनेक निर्णयांची अंमलबजावणी होण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर स्वतंत्र पथकेदेखील तयार करण्यात आली आहेत.
कराड-ढेबेवाडी रस्त्यावर कराडपासून सात किलोमीटरवर अंतरावर वसलेले चचेगाव हे शेतीतही अग्रेसर गाव आहे. गावाजवळून कोयना नदी वाहते. त्यामुळे गावचे शिवार मोठय़ा प्रमाणात आजही बागायती आहे. चचेगावात ऊसशेती मोठय़ा प्रमाणात होते. गावातील शेतकरी केळी, हळद, भाजीपाला या शेतीकडे वळले आहेत. कराड, मलकापूर या जवळच्या बाजारपेठांचा त्यांना लाभ होत असतो. मजूरटंचाई लक्षात घेऊन त्यांनी यंत्रे, अवजारे यांच्या वापरावरदेखील भर दिलेला आहे.
मोबाईलमध्ये गुंतून पडण्यामुळे मुलांचा अभ्यास आणि पालकांशी संवाददेखील थांबला. त्यामुळे मुलांचे लक्ष अभ्यासावर केंद्रित व्हावे त्याचप्रमाणे पालकांशीही संवाद वाढावा अशी अभिनव कल्पना दोन-तीन वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव येथील रानकवी सु. धों. मोहिते यांना सुचली. गावच्या ग्रामसभेत त्यांनी तसा ठराव मांडला. त्यानुसार गावात अंमलबजावणी सुरू झाली. संध्याकाळी सात वाजता भोंगा वाजतो आणि गावातील सर्व मोबाईल व टीव्ही बंद केले जातात. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता दुसऱयांदा भोंगा वाजला की, मोबाईल व टीव्ही सुरू करण्यास परवानगी असे मानले जाते. या गावची बातमी महाराष्ट्रात सर्वदूर पसरली आणि अनेक गावांनी याचे अनुकरण केले आहे. मोहित्यांचे वडगाव या गावातील ही परंपरा आजही काटेकोरपणे पाळली जात आहे.
मद्यपानामुळे अनेकांचे संसार डबघाईला आलेले आपण महाराष्ट्रात सर्वत्र पाहतो. घरातील महिलेला मारहाण करणारी उदाहरणेही अनेक आहेत, पण हा विचार करून गावातील अवैध मद्यविक्री व अन्य अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आणि मोर्चा काढून त्याबाबतचे निवेदन प्रशासन, पोलीस, उत्पादन शुल्क विभागाला दिले. आज खऱया अर्थाने हे सर्व व्यवसाय प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्यातून बंद करण्यात चचेगावच्या महिलांना यश आले आहे. चचेगावची लोकसंख्या साडेतीन हजारांच्या जवळपास आहे. ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करता यावा यासाठी 24 तास पाणी योजनेचे कामदेखील पूर्ण झालेले आहे. ग्रामपंचायतीमार्फत दररोज माणशी 55 लिटर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
जलजीवन मिशनअंतर्गत ‘हर घर जल’ योजनेतून पाणी पुरवठय़ासाठी निधी मंजूर झाला आहे. गावातच मुलांना शाळेसंबंधी उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी ग्रामस्थांनी मोठय़ा प्रमाणात पुढाकार घेतला आहे. समाजातील दानशूरांना त्यासाठी साद घातली आहे. चचेगावची अजून वेगळी ओळख आणि वैशिष्टय़ म्हणजे चचेगावाला तंटामुक्त गाव तसेच निर्मल ग्राम पुरस्कारदेखील मिळाला आहे. गाव 100 टक्के हागणदारीमुक्तदेखील घोषित झाले आहे. शेवटी एवढेच, ग्रामपंचायत विकायला निघालेल्या, चुकीचा पायंडा पाडणाऱया ग्रामपंचायत सदस्य व गावकऱयांनी या आदर्श गावाचा एकतरी उपक्रम आपल्या गावात राबवावा.