प्रासंगिक – कृतिशील तत्त्वचिंतक आणि द्रष्टे व्यक्तिमत्त्व

तत्त्वचिंतक आणि स्वाध्याय परिवार प्रणेत पांडुरंगशास्त्री आठवले

आमोद दातार, स्वाध्याय परिवार

19 ऑक्टोबर म्हणजे या विसाव्या शतकातील कृतिशील तत्त्वचिंतक व वैश्विक स्वाध्याय परिवाराचे प्रवर्तक पद्मविभूषण पांडुरंगशास्त्री आठवले ऊर्फ दादा यांचा जन्मदिवस. 19 ऑक्टोबर हा दिवस वैश्विक स्वाध्याय परिवार ‘मनुष्य गौरव दिन’ या सार्थ नावाने साजरा करतो आणि विशेष म्हणजे आज दादांचा शंभरावा जन्मदिवस आहे त्यानिमित्त…

स्वाध्याय परिवराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले हे केवळ प्रकांडपंडित किंवा वेदशास्त्रीसंपन्न शास्त्री होते म्हणून विरळ व्यक्तिमत्त्व होते असे नाही. कारण आपल्या देशात तरी शास्त्री, पंडित, विद्वान यांची कधीच कमतरता नव्हती. परंतु दादा व्युत्पन्न पंडित असूनही माणसामाणसाला निरपेक्ष प्रेमाचा उबारा देत फिरले. एखादा तैलबुद्धीचा ‘शास्त्री’ स्वतःचे मोठेपण सोडून हजारों गावात लाखो लोकांना प्रेमाने भेटतो, विचार देतो, अस्मिता देतो, निरपेक्ष संबंध बांधतो, अशी घटना या देशाने दुसरी पाहिलेली नाही असे म्हटले तर ती अतिशयोक्ती ठरू नये. 1954 च्या जपान येथील जागतिक तत्त्वज्ञान परिषदेत दादांनी प्रखर विचार मांडल्यावर अमेरिकेचे थोर विचारवंत डॉ. कॉम्प्टन यांनी अमेरिकेला येऊन कार्य करण्याची दिलेली आकर्षक ऑफर क्षणार्धात नाकारून स्वदेशात प्रथम काहीतरी घडवून दाखवीन व मग अमेरिकेत येईन हा दृढ संकल्प करणे, यात दादांची प्रखर राष्ट्रनिष्ठा व प्रचंड आत्मविश्वास दिसतो. आजकाल ‘येनकेन प्रकारेण प्रसिद्धपुरुषोभवेत्’ अशा रीतीने झटपट कीर्तीसाठी हपापलेल्या समाजात कीर्तीचा मोह सोडणारा दादांसारखा महापुरुष या देशात होऊन गेला हे खरं सुद्धा वाटणार नाही.

दादा नेहमी म्हणायचे, ज्या भारतभूमीत अजोड तत्त्वज्ञान निपजलं, अवतार झाले त्या भूमीतील माणसे रडकी का? माणसामाणसात इतके भेद का? अशा वेळी दादांनी हे स्पष्ट ओळखले की, गीतोक्त हृदयस्थ भगवंताचा (Indwelling God)चा विचारच परिवर्तन करू शकेल. जर विश्वाची नियामक शक्ती माझ्यात येऊन राहत असेल तर मी हलका असूच शकत नाही, मी कमी असूच शकत नाही. गीतेतील हृदयस्थ भगवंताची संकल्पना माणसाला अस्मिता देऊ शकते. मी हलका नाही ही खुमारी माणसात आणू शकते.

दादा नेहमी म्हणत असत की, जर भगवद्शक्ती माझ्यात बसली आहे हे बुद्धीत उतरले तर वाईट वर्तन का नाही कमी होणार? व्यसन का नाही सुटणार? आज कदाचित खोटंही वाटेल, पण एक-दोन नाही, तर हजारो स्वाध्यायी गावांतून व्यसने हद्दपार झाली, तंटे मिटले, भेदाभेद मिटले; ते काही आंदोलने करून अथवा दमदाटीने नव्हे, तर केवळ हृदयस्थ भगवंताच्या जाणिवेतूनच. दादांनी व्यसनमुक्ती किंवा तंटामुक्ती आंदोलन नाही केलं, तर फक्त ईशस्पर्श व ईशसंबंध सांगून दृढ केला. वास्तविक अर्थाने भक्तीच्या संकल्पनेचं सामाजिकीकरण केले.

’मनुष्य गौरव’ हेही दादांचे अत्याधिक महत्त्वपूर्ण योगदान. माणूस आत्मगौरवरहित का? माणूस विकला का जातो? माणूस, मग तो कितीही मोठा का असेना, आज विकत घेऊ शकणारी वस्तू बनला आहे. मी विकाऊ आहे, मी चार पैशांच्या आमिषाने विकला जाऊ शकतो याची आज ना खंत उरली आहे ना खेद. आज दुर्दैवाने समाजात बाह्य आभूषणांशिवाय गौरवच मिळत नाही. ज्याच्याकडे वित्त आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ती आहे त्यालाच किंमत मिळते. पण ही सर्व आभूषणे नसतील तर माणसाला किंमतच नाही का? समाजातील 90 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे यातील काहीच नाही व ते नसल्यामुळे जर त्यांना किंमतच मिळणार नसेल, गौरव प्राप्त होणार नसेल तर आपण खरोखरच सुधारलो आहोत का? प्रगत झालो आहोत का? हा विचार किमान सुविद्य माणसांनी तरी करायला हवा आहे. दादांनी ठामपणे सांगितले की, तुझ्याकडे या प्रस्थापित शक्तींपैकी काहीही नसेल कदाचित, पण तुझ्याजवळ तुझा भगवंत आहे, तो तुझे शरीर चालवतोय. चराचर सृष्टी चालवणारा भगवंत माणसात येऊन राहिला आहे हाच माणसाचा सर्वात मोठा गौरव आहे. मनुष्याचा हा गौरव उभा करण्यासाठी पांडुरंगशास्त्री आठवले यांनी अवघे आयुष्य वेचले.

आत्मगौरव व अस्मितायुक्त माणूस उन्मत्त किंवा बेदरकार होण्याचा संभवच अधिक असतो. त्यामुळे दादांनी आत्मगौरव उभा करतानाच ‘परसन्मानाची’ स्पष्ट कल्पना दिली. जसा ईश्वराच्या माझ्यातील अस्तित्वामुळे माझा गौरव आहे तसेच दुसऱयामध्येही त्याच शक्तीचे अस्तित्व आहे. त्यामुळे दुसरा हा दुसरा नसून माझा दैवी भाऊ आहे ही समज दादांनी रुजविली. दैवा

– भ्रातृभावाच्या नात्याने लाखो मानवांचा समूह दादांनी परस्पर जोडला. असा मनुष्य गौरव लाखोंना प्रदान करणाऱया पांडुरंगशास्त्री आठवले यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. दादांचा वैश्विक स्वाध्याय परिवार हे अत्याधिक आनंदाचे पर्व उत्साहाने व आपली कृतिशीलता अर्पण करून साजरे करेलच, पण आजच्या या मनुष्य गौरवदिनी दादांना भावपूर्ण वंदन!

आपली प्रतिक्रिया द्या