स्मरण – महान दार्शनिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आनंद मुकुंदराव मुंजे

एक सामान्य राजकारणी हा वर्तमानकाळात वावरतो आणि पुढे येणाऱ्या निवडणुकीचा विचार करतो, परंतु एक युगपुरुष पुढील शंभर वर्षांचा विचार करतो व त्याप्रमाणे आपल्या धोरणांची आखणी करतो. धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे महान युगपुरुष होते व जो विचार त्यांनी आजपासून शंभर वर्षांपूर्वीच केला त्याचे प्रत्यंतर आपल्याला आज वारंवार येत आहे. हिंदूंच्या संघटनेचे प्रवर्तक व हिंदुस्थानच्या सैनिकीकरणाचे अग्रणी म्हणून हिंदुस्थानच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कायमचे कोरले गेले आहे.

पारतंत्र्याच्या काळातही ब्रिटिशांकडून हिंदू हितरक्षण व सैनिकीकरण या ध्येयासाठी जवळपास संपूर्ण युरोप दौरा तसेच नेपाळ, ब्रह्मदेश (म्यानमार), श्रीलंका सध्याचा पाकिस्तान व बांगलादेश पालथा घालून सतत संघर्ष केला व त्यात यशही मिळाले. नागपूरचे निर्वाचित प्रतिनिधी या जबाबदारीने त्यांनी ‘केंद्रीय कायदे मंडळ’ आणि दोनदा सहभागी होऊन ‘लंडन येथील गोलमेज परिषदेत’ या दोन्ही ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले व त्यात मोठे यश मिळाले. देहरादून येथील ‘इंडियन मिलिटरी ऍकॅडमी’ची स्थापना 1932 साली होण्यास धर्मवीर डॉ. मुंजे यांचा ब्रिटिशांशी केलेला विधायक संघर्ष कामास आला. यासाठी ब्रिटिश सरकार पूर्णपणे प्रतिकूल होते व हिंदुस्थानी युवकांची सैनिक अधिकारी बनण्याची अजिबात योग्यता नाही, ते गुण त्यांच्यात नाहीत तसेच हिंदुस्थानी युवकांमध्ये शिस्त व लढाऊ बाण्याचीच कमतरता आहे, असा ब्रिटिशांचा ठाम दृष्टिकोन होता. दुसरीकडे राजकीय क्षितिजावर ‘अहिंसा तत्त्वाचे वारे’ सर्व देशभर जोरात वाहत असताना डॉ. मुंजे यांच्या धोरणांची टिंगलटवाळी करण्यातच सर्व देश मग्न होता व या सर्व प्रतिकूल परिस्थितीतही ब्रिटिश सरकारला मात्र त्यांच्या विचारांतली दूरदृष्टी कळली. तत्कालीन गांधीप्रणीत काँग्रेस पुढाऱयांनी जरी डॉ. मुंजेवर टीका केली तरी स्वातंत्र्यानंतर उद्भवलेल्या सततच्या (युद्ध) परिस्थितींमुळे डॉ. मुंजे यांच्या दूरदर्शितेचे महत्त्व  काँग्रेस नेत्यांनाही पटले व त्यांना डॉ. मुंजे यांच्या कामाची महती पटली. डॉ. बा. शि. मुंजेंच्या चरित्राच्या दुसऱया खंडाला रा. स्व. संघाचे दिवंगत सरसंघचालक बाळासाहेब देवरसांनी जी प्रस्तावना दिलेली आहे त्यातील एक थोडासा अंश इथे लिहिणे संयुक्तिक होईल.

दोन गोष्टींसाठी (हिंदू संघटन व हिंदुस्थानचे सैनिकीकरण) डॉ. मुज्यांनी अविश्रांत परिश्रम केले होते. त्यांना निंदा, अपमान, उपहास, छळ, उपेक्षा या सर्व अवस्थांतून जावे लागले, पण आपल्या कर्तव्य मार्गातून एका क्षणासाठीही ते विचलित झाले नाहीत. ते एखाद्या कर्मयोग्याप्रमाणे स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता मृत्यूपर्यंत ध्येयसिद्धीस्तव झगडत राहिले. एखाद्या दार्शनिकाची पूजा त्याच्या जीवनकाळात होत नसते अशा अर्थाची उक्ती कुठेतरी वाचल्याचे स्मरते. डॉ. मुंजेंच्या बाबतीत तसेच झाले आहे. त्यांच्या हिंदू संघटनेचा व सैनिकशक्तीचा आग्रह कालोचित होता, ही गोष्ट आता सर्वमान्य झाली आहे.

‘इंडियन मिलिटरी ऍकॅडमी’च्या उद्घाटनाला (1932) आणि जेव्हा पहिली सैन्य अधिकाऱयांची तुकडी पासआऊट झाली त्या दोन्ही कार्यक्रमांना डॉ. मुंजे हजर होते व उल्लेखनीय म्हणजे तत्कालीन कोणतेही नेते त्याला नव्हते. याच पहिल्या बॅचमध्ये 1971च्या हिंदुस्थान-पाक युद्धाचे हिंदुस्थानचे सेनाप्रमुख फिल्ड मार्शल सॅम माणेकशाह कॅडेट ऑफिसर होते एवढे सांगितले म्हणजे पुरे. त्यांच्याच नेतृत्वात पाकिस्तानला कायमची अद्दल घडवून बांगलादेशची निर्मिती होऊन पाकिस्तानी सैन्याचे 90000 जवान शरण आले होते. डॉ. मुंजेंनी गोलमेज परिषदेला जाण्याचा निर्णय घेतला, परंतु म. गांधीप्रणीत काँग्रेसचा त्यास बहिष्कार होता. अहिंसेच्या तत्त्वाला हरताळ फासून नागपूरमध्ये डॉ. मुंजेंचे पुतळेही जाळले व अभद्र घोषणा दिल्या. पण डॉ. मुंजेंनी याची तमा बाळगली नाही.

गोलमेज परिषदेहून परतल्यावर (एप्रिल 1931) संघातर्फे डॉ. मुंजे यांचा जाहीर सत्कार झाला. ध्वजवंदनासह डॉ. मुंजे यांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देण्यात आला व त्यानंतर आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांनी डॉ. मुंजे यांच्या नेतृत्वगुणांचे व सत्यनिष्ठsचे तोंडभरून कौतुक केले. डॉ. मुंजे हे शेवटपर्यंत डॉ. हेडगेवारांना ‘गुरू व पित्या’ समान होते व संघाच्या संकल्पना, लष्करी प्रशिक्षण इत्यादीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. आज आपला देश धर्मवीर डॉक्टर बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी ज्या ध्येयवादासाठी आयुष्य निस्वार्थपणे खर्ची घातले. त्यानुसार वाटचाल करीत आहे.